रयत संघटनेची मागणी ; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
निपाणी (वार्ता) : यंदाच्या हंगामातील ऊस तोडणीसाठी १५ नोव्हेंबरपासून साखर कारखाने चालू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले तरीही कर्नाटक सीमा भागातील काही कारखाने उसाची तोडणी करीत आहेत. त्याची माहिती मिळताच कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार, अध्यक्ष चुनाप्पा पुजारी, संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ठिय्या आंदोलन केले. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांनी अशा कारखान्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले.
अनेक साखर कारखान्यांनी यंदाच्या हंगामातील दर जाहीर केलेला नाही. तरीही उसाची तोड करीत आहेत. कारखान्यांनी जाहीर केलेला दर ऊस उत्पादक शेतकरी आणि रयत संघटनेला मान्य असेल तरच उसाला तोड देण्यात येणार आहे. कोणत्याही साखर कारखान्याला आपला विरोध नसून दराबाबत आंदोलन सुरू केले आहे. जिल्हाधिकरी, आणि साखर आयुक्तांचा आदेश डावलून यांचा आदेश डावलून कारखाने चालू केलेले आहेत. त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी. प्रति टनचा दर जाहीर करूनच कारखाने सुरु करावे, अशी मागणी रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली. याशिवाय संकेश्वर एपीएमसी बाबतही जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. त्यालाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे तात्पुरते आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी चुनाप्पा पुजारी,तालुकाध्यक्ष संजू हवन्नवर तालुका उपाध्यक्ष शिवलिंग पाटील, तालुका प्रधान सचिव नागराज हदिमनी, तालुका व्यवस्थापक सिद्धप्पा नाय, संकेश्वर ब्लॉक अध्यक्ष सुरेश गस्ती, काडाप्पा मगदुम, आनंदा मगदुम, केम्पण्णा सवदत्ती, कल्लाप्पा मरडी, बसुराज गिरीमलनावर, केंचया पाटील, प्रशांत पाटील यांच्यासह रयत संघटनेचे कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.