1 कोटी 4 लाख रुपयांची विक्री
बेळगाव : बेळगाव शहरात आयोजित असलेल्या सूत, खादी उत्पादने वस्तू प्रदर्शन आणि विक्री मेळाव्यामुळे चार दिवसांत 1 कोटी 4 लाख रुपयांची खादी उत्पादने विकली गेली आहेत. नागरिकांनी खादीला दिलेल्या प्रतिसादामुळे हा मेळावा अत्यंत यशस्वी ठरला आहे. आमदार असिफ सेठ यांनी नागरिकांनी खादी उत्पादने खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार मानले.
बेळगावच्या विविध भागातून नागरिकांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला भेट दिली असून खादी उत्पादने खरेदी केली. या प्रदर्शनात 150 स्व-सहाय संघटना आणि 50 खादी उत्पादकांनी 200 वेगवेगळ्या स्टॉल्सद्वारे सहभाग घेतला आहे. अत्यंत दर्जेदार आणि परंपरेची जपणारी खादी वस्त्रांमध्ये विविध प्रकारचे कापड, हाताने तयार केलेले वस्त्र, आणि पर्यावरणाला अनुकूल असलेले उत्पादने सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली आहेत.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी सांगितले की, गेल्या प्रदर्शनाच्या तुलनेत यावेळी 4 दिवसांत मोठ्या प्रमाणात खादी वस्त्रांची विक्री झाली आहे. यामुळे खादी उत्पादनांच्या लोकप्रियतेत लक्षणीय वाढ झाली असून, स्व-सहाय संघटनांनीही यामध्ये चांगला प्रतिसाद दिला आहे. अक्का कॅफेमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींनी एकाच दिवशी 1 लाख रुपये विक्री केली आहे. 30 टक्के सूट आहे. स्व-सहाय्य संघटनेच्या या प्रदर्शनाला भेट देऊन प्रोत्साहन द्यावे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे सर्वत्र शोक व्यक्त होत असून, 10 दिवसांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना स्थगिती देण्यात आली आहे. जुलै 2 आणि जुलै 3 रोजी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
आमदार असिफ सेठ यांनी खादी मेळाव्यात सहभागी असलेल्या सर्व नागरिकांचे आभार मानले. त्यांनी खादी उत्पादनांची गुणवत्ता आणि विविधतेच्या संधींसाठी अधिकाधिक लोकांनी सहभाग घेतला पाहिजे, असे स्पष्ट केले. यामध्ये स्व-सहाय संघटना आणि महिला उपक्रमांना अधिकाधिक प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार असिफ सेठ यांनी या प्रदर्शनात खादी उत्पादनांच्या विक्रीची दिशा पुढील काळात अधिक सक्षम आणि व्यापक बनवण्याचा विचार केला आहे. आगामी काळात एअरपोर्ट आणि रेल्वे स्थानकाजवळही खादी विक्री केंद्र सुरू करण्याचा मानस आहे, तसेच बस स्थानकांवरही खादी उत्पादने विक्रीसाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे, असे सांगितले.