
बेळगाव : सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 50 व्या बॅरिस्टर नाथ पै व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प सोमवारी जेष्ठ अभिनेते प्रसाद पंडित यांनी गुंफले “माझा नाट्यप्रवास” या विषयावर बोलताना त्यांनी आपल्या हायस्कूल जीवनात शिवाजी महाराजांच्या जीवनातील अफजलखानाचा वध याप्रसंगापासून नाट्य क्षेत्रातील पदार्पण कसे झाले तेव्हापासून अनेक नाटकात त्यांच्या भूमिका कशा गाजल्या याचे महत्त्व त्यांनी विशद केले.
बाप्पा शीरवईकर यांनी आपल्यातील अभिनव कला हेरून कसे मार्गदर्शन केले त्यानंतर प्रभाकर पणशीकर, मधुकर तोडरमल, राजा गोसावी यांच्याबरोबरच्या भूमिका कशा गाजल्या याची अतिशय रंजक माहिती त्यानी सांगितली. कलाकाराची निरीक्षण शक्ती जबरदस्त असली पाहिजे तरच तो आपल्या कलेमध्ये यशस्वी होऊ शकतो असेही ते म्हणाले. केवळ 45 सेकंदाच्या चित्रपटातील भूमिकेसाठी किती यातना सहन कराव्या लागल्या पण त्यातून त्यांच्यातील कलाकार कसा घडत गेला याचेही कथन त्यांनी केले.
वाचनाचे अध्यक्ष अनंत लाड यांनी त्यांचे पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. उपाध्यक्ष विनोद गायकवाड यांनी त्यांचा परिचय करून दिला आणि संचालक रघुनाथ बांडगी यांनी आभार प्रदर्शन केले. नेताजी जाधव यांनी सूत्रसंचालन केले. प्रमुख पाहुणे मधुरा हॉटेलचे संचालक मधु बेळगावकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. त्यांचा सन्मान डॉक्टर गायकवाड यांनी केला.
यावेळी व्यासपीठावर कार्य व सुनीता मोहिते व सह कार्यवाह अनंत जांगळे हेही उपस्थित होते. खचाखच भरलेल्या सभागृहात अनेक वेळा टाळ्यांचा गडगडाट ऐकू येत होता.
Belgaum Varta Belgaum Varta