बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. सरदार हायस्कूल मैदानावरून सुरू झालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण करावीत, या मागणीसाठी जोरदार निदर्शने करण्यात आली.
अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्यांच्या विविध मागण्यांसाठी आयोजित या मोर्चाची सुरुवात सरदार हायस्कूल मैदानावरून झाली. हातात मागण्यांचे फलक घेऊन निदर्शने करणाऱ्या महिलांनी राणी चन्नम्मा सर्कल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच केली. या मोर्चामध्ये बेळगाव तालुक्यातील शेकडो अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनात आशा कार्यकर्त्यांनी सरकारवर आश्वासन न पाळल्याचा आरोप केला. मागील महिन्यात बेंगळुरूमध्ये झालेल्या आंदोलनात मुख्यमंत्री यांनी १० हजार रुपये सन्मानधन देण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र, अद्यापही या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. तसेच, सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना ६० व्या वर्षी निवृत्ती देऊ नये, अशीही मागणी संघटनेने केली. एआयटीयूसीच्या सचिव गीता रायगोल यांनी त्वरित सन्मानधन वाढविण्याची मागणी केली.
संघटनेचे प्रमुख गंगाधर बडिगेर यांनीही सरकारवर टीका करत, बजेटपूर्व बैठकीत आशा कार्यकर्त्यांचे मानधन एक हजाराने वाढवून सहा हजार करणे अपेक्षित होते, मात्र त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप केला. या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
मोर्चाच्या शेवटी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निवेदन स्वीकारून, कार्यकर्त्यांच्या मागण्या शासनाकडे पोहोचविण्याचे आश्वासन दिले. तसेच, यासंबंधी तातडीने योग्य निर्णय होण्यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी स्पष्ट केले.
Belgaum Varta Belgaum Varta