बेळगाव : पूर्वी अस्पृश्यता आचरणात होती, आज अस्पृश्यता आचरणात नसली तरी ती सुशिक्षितांच्या मनात आहे, ही एक शोकांतिका आहे, असे विचारवंत भीमपुत्र संतोष यांनी म्हटले.
बेळगावमधील डॉ. आंबेडकर उद्यान येथे कर्नाटक दलित संघर्ष समिती आंबेडकरवाद यांच्यावतीने शोषितांचा संघर्ष दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शोषितांच्या संघर्ष दिन कार्यक्रमात ते बोलत होते. 20 मार्च 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड चवदार तळ्याचे पाणी स्पर्श करून अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ सुरू केली होती. त्या दिवसाची आठवण म्हणून आज शोषितांच्या संघर्षाचा दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून महानगरपालिका आयुक्त शुभा बी., समाज कल्याण विभागाचे सहसंचालक रामनगौडा कन्नोळी, डी. श्रीकांत, मल्लेश चौगुले, भाऊराव गडकरी, आनंद संदरीमनी, महांतेश तळवार यासह इतर मान्यवर उपस्थित होते. डॉ. बाबासाहेबांनी अस्पृश्यतेविरुद्ध केलेल्या चळवळीचा संदर्भ दर्शविणारे आणि त्यांचे संदेश पोहोचवणारी स्मारके उभी केली पाहिजेत. याकडे सरकारचे लक्ष वेधले जाईल, असे महापालिका आयुक्त शुभा बी यांनी यावेळी बोलताना सांगितले.
मानवता ही कोणत्याही गोष्टीपेक्षा मोठी आहे. शोषितांची परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षण हे औषध आहे, असे बाबासाहेब म्हणत असत. सरकार शिक्षणावर भर देत आहे. पण, सुशिक्षितांच्या मनात आजहीअस्पृश्यता दिसून येते. पूर्वी अस्पृश्यता आचरणात होती, आज अस्पृश्यता आचरणात नसली तरी ती सुशिक्षितांच्या मनात आहे, ही एक शोकांतिका आहे, असे विचारवंत भीमपुत्र संतोष यांनी यावेळी बोलताना म्हटले.
शशी साळवे, नागेश कामशेट्टी, बसवराज डाके, आर.जी. कांबळे, मनोहर अज्जनकट्टी, अप्पासाहेब केगन्नवर, अप्पासाहेब मेलगेरी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta