(बांधकाम विभागावर ताशेरे : वृक्षसंपदा जगवणे ही काळाची गरज)
चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्याची खरी ओळख असणारी येथील वृक्षसंपदा ही दिवसेंदिवस नामशेष होताना दिसत आहे. चंदगड हद्दीतील भले मोठे वृक्ष तोडण्याचा सपाटा गेल्या वर्षापासून सुरू आहे. रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावरील चंदगड हद्दीच्या शिनोळी ते सिंधुदुर्ग जिल्हा हद्दीदरम्यान असलेल्या दुतर्फा आंबा, फणस, सिसम, वड जातीच्या प्रचंड मोठ्या घेरातील वृक्षांची कत्तल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आशीर्वादाने होत आहे.
रस्त्याच्या कामाचा कुठेही पत्ता नाही. मात्र, गेली दोन-तीन वर्षे झाली या मार्गावरील महावृक्षांवर घाला घालण्याचे काम सुरू आहे. एकीकडे ‘झाडे लावा झाडे जगवा’ या घोषणा केवळ शाळेच्या विद्यार्थ्यांनी द्यायच्या, अवाढव्य खर्च करायचा, फलीत काही नाही, एवढे करण्याऐवजी आहेत त्या झाडांचे संवर्धन का केले जात नाही? हा प्रश्न समोर उभा राहतो. या दोन-तीन वर्षांत प्रचंड मोठ्या प्रमाणावर दुतर्फा वृक्ष जे मोठ्या संख्येने होते ते तोडले आहेत.
बांधकाम विभागाकडून तोडलेल्या झाडाच्या ठिकाणी ठेकेदार रोप लागण करून संगोपनाची जबाबदारी घेतली आहे, असे सांगितले जात होते. पण या दोन तीन वर्षांत एक ही झाड लावून जगवले असेल तर दाखवावे. चंदगड ते चंदगड फाटा मार्गावर ही अशीच प्रचंड मोठ्या घेराची आंबा, फणस, सिसम जातीची झाडे होती, ती ही तोडण्यात आली.
सध्याच्या स्थितीमध्ये चंदगड-चंदगड फाटा, तसेच शिनोळी ते सिंधुदुर्ग हद्दीपर्यंतची शिल्लक राहिलेली झाडे वाचली पाहिजेत. वृक्ष तोडी संदर्भातील नियम वनखात्याने चोख बजावले तर वृक्ष संवर्धन नक्कीच होईल. जे झाड / वृक्ष धोकादायक आहे, जे जिर्ण आहे अशांनाच तोड परवाना देणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित झाडाचा प्रत्यक्षात पंचनामा करणे आवश्यक आहे. त्यामुळे एकंदरीत वृक्षतोड थांबावी, बेकायदेशीरपणे वृक्षतोड करणाऱ्या अश्या ठेकेदारावर व मलई खाणाऱ्या अधिकाऱ्यावर धडकपणे कारवाई व्हायला हवी अशी मागणी चंदगडवाशी व पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.