Tuesday , April 7 2026
Breaking News

रायगड जिल्ह्यातून सीमावाद मोहिमेला बळ; पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

 

माणगाव : बेळगाव सीमावादाच्या दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नाला न्याय मिळावा यासाठी सुरू करण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेला रायगड जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. माणगाव, म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यातील पत्रकारांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून पाठिंबा दर्शविला आहे. आगामी काळात जिल्ह्यातील इतर तालुक्यांनाही भेट देऊन या मोहिमेला अधिक बळ दिले जाणार असल्याची माहिती ज्येष्ठ पत्रकार नरेश पाटील यांनी दिली.

कोल्हापूर विभागातील ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी सीमाभागातील पत्रकारांना उद्देशून केलेल्या आवाहनात, दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रश्नासाठी माध्यमांनी पुढाकार घेण्याचे आणि तो सर्वोच्च न्यायालय येथे प्रलंबित असलेला मुद्दा लवकर निकाली निघावा यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले होते.

गेल्या सुमारे ७० वर्षांपासून सुमारे ४० लाख मराठी भाषिक नागरिक या निर्णयाची प्रतीक्षा करत आहेत. चार पिढ्या उलटून गेल्यानंतर आता पाचवी पिढी न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान, महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्य सरकारांनी या प्रश्नावर केवळ राजकारण केल्याचा आरोपही व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर सीमाभागातील पत्रकारांनीच पुढाकार घेत १ लाखांहून अधिक स्वाक्षऱ्या गोळा करण्याचे उद्दिष्ट ठेवत ही मोहीम सुरू केली आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव शहरातून या मोहिमेची सुरुवात झाली असून, आता म्हसळा व श्रीवर्धन तालुक्यांतील पत्रकारही त्यात सहभागी झाले आहेत.

दरम्यान, माणगाव शहरातील अनेक पत्रकारांनी आधीच स्वाक्षऱ्या करून पाठिंबा दर्शविला आहे. आज सायंकाळी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष गौतम जाधव यांच्या नेतृत्वाखालील पत्रकारांचा एक गट, प्रसिद्ध पत्रकार पद्माकर उभारे यांच्या निवासस्थानी एकत्र येऊन या स्वाक्षरी मोहिमेला अधिक बळ देणार असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार संतोष सुतार यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा केवळ भौगोलिक प्रश्न नसून मराठी अस्मिता, भाषा आणि हक्कांचा जाज्वल्य विषय बनला आहे. या पार्श्वभूमीवर सीमाभागातील मराठी बांधवांच्या न्याय्य मागण्यांना बळ देण्यासाठी आता रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील पत्रकारही पुढे सरसावले असून त्यांनी एकजूट दाखवत स्वाक्षरी मोहिमेद्वारे ठोस पाठिंबा तिसरा टप्पा अंतर्गत दर्शविला आहे.

या अनुषंगाने माणगाव तालुका प्रेस क्लबचे सदस्य ज्येष्ठ पत्रकार पद्माकर उभारे यांच्या निवासस्थानी पत्रकार एकत्र जमले होते. यावेळी माणगाव तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष संतोष सुतार, गौतम जाधव, पद्माकर उभारे, प्रभाकर मसुरे सर, भाऊ विनोद सापळे, सुनील राजभर, सौ. आरती महामुणकर, उत्तम तांबे, विश्वास गायकवाड, एस. वनारसे, हरेश मोरे आदी पत्रकारांनी उपस्थित राहून स्वाक्षरी करून आपला पाठिंबा दर्शविला.

यावेळी वृत्तपत्रकार नरेश पाटील यांनी उपस्थित पत्रकारांना या स्वाक्षरी मोहिमेबाबत सविस्तर माहिती दिली. सीमाभागातील मराठी पत्रकारांनी हाती घेतलेल्या या उपक्रमाचा उद्देश, त्यामागील भूमिका व मराठी भाषिकांच्या हक्कासाठी उभे राहण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. तसेच माणगाव येथील पत्रकारांनीही या चळवळीला साथ देत स्वाक्षरी करून ऐक्य दाखवावे, असे आवाहन त्यांनी केले.

या आवाहनाला प्रतिसाद देत उपस्थित पत्रकारांनी स्वाक्षरी करून एमईएसच्या मागणीला पाठिंबा दिला व मराठी बांधवांच्या हक्कासाठी एकजूट असल्याचा ठाम संदेश दिला. यावेळी सर्वांनी एकमुखाने या चळवळीला पाठिंबा देण्याचा निर्धार व्यक्त केला.

दरम्यान, या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वाक्षरी करून पाठिंबा दर्शविलेल्या सर्व पत्रकारांचे नरेश पाटील यांनी मनःपूर्वक आभार मानले. मराठी अस्मिता आणि हक्कांच्या लढ्यात माणगावातील पत्रकारांनी दाखविलेल्या एकजुटीबद्दल त्यांनी विशेष कृतज्ञता व्यक्त केली.

About Belgaum Varta

Check Also

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाची निर्णायक लढाई; रायगडातून सह्यांच्या मोहिमेला गती

Spread the love  रायगड (नरेश पाटील) : दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाची लढाई आता निर्णायक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *