Wednesday , December 10 2025
Breaking News

प्रा. डॉ. रमेश साळुंखे यांच्या राजकीय नाटक आणि गो. पु. देशपांडे या संशोधन ग्रंथाला ‘प्रा. प्रल्हाद लुलेकर निर्मिक साहित्य पुरस्कार’

Spread the love

 

 

निपाणी (वार्ता) : प्रा.प्रल्हाद लुलेकर प्रतिष्ठान,औरंगाबाद’च्या वतीने मागील दोन वर्षापासून मराठी साहित्यातील समीक्षा, संशोधन आणि वैचारिक लेखनासाठी ‘प्रा.प्रल्हाद लुलेकर निर्मिक साहित्य पुरस्कार’ सुरू करण्यात आला आहे. पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे. २०२३ चा पुरस्कार प्रा. डॅा. रमेश साळुंखे यांच्या ‘राजकीय नाटक आणि गो.पु. देशपांडे’ या ग्रंथाला घोषित करण्यात आला आहे.या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम १०,००० रुपये व सन्मानचिन्ह असे असेल.
प्रथम वर्षातील पहिला २०२१ चा पुरस्कार डॅा.दिलीप चव्हाण यांच्या ‘समकालीन भारत: जातिअंताची दिशा’ या वैचारिक ग्रंथाला तर,२०२२ चा दुसरा पुरस्कार डॅा. सुधाकर शेलार यांच्या ‘साहित्यसंशोधन : वाटा आणि वळणे’या संशोधनविषयक ग्रंथाला देण्यात आला होता.
डॅा.रमेश साळुंखे हे मराठी साहित्य व्यवहारात संशोधक, समीक्षक, अनुवादक आणि नाट्यलेखक म्हणून परिचित आहेत. विविध वर्तमानपत्रे आणि वाड्मयीन नियतकालिकातून त्यांचे लेखन सातत्याने प्रसिध्द झालेले आहे. सद्या ते देवचंद महाविद्यालय, अर्जुननगर येथे मराठी विषयाचे अध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ‘राजकीय नाटक आणि गो. पु. देशपांडे’ हा त्यांचा समीक्षाग्रंथ मराठी समीक्षविश्वात मोलाची भर घालणारा आहे.
नाटकातून स्वायत्त राजकीय विचारविश्व मांडणारे, पारंपरिक कलेच्या इतिहासाला छेद देत स्वतःचे वेगळेपण ठसवणारे नाटककार म्हणून गो. पु. देशपांडे यांचे मूल्यमापन प्रस्तुत ग्रंथाच्या माध्यमातून साळुंखे यांनी केले आहे. गोपु विचारप्रधानता, चर्चात्मकता आणि राजकीय विचारसरणीची मांडणी नाटकांमधून वारंवार करतात. त्यांच्या समग्र नाटकांचा विचार केला तर ‘संदर्भसंपृक्तता’ हे महत्त्वाचे वैशिष्ट्य जाणवते. संस्कृत साहित्य, मौखिक परंपरेतील कीर्तन, संत, पंत, तंत कविता, पंडिता रमाबाईंचे जुना करार हे भाषांतर, टिळकांचा ‘केसरी’ सानेगुरुजींचे ‘साधना’ अशी नियतकालिके, सुलभ राष्ट्रीय ग्रंथमाला, विनोबा भावे यांची गीताप्रवचने, बेडेकरांचे ‘गेल’वर आधारित लेखन, ब्रेख्त, शिलर, बाख्तिन, दोस्तऐवस्की, वॉल्टर बेंजामिन, आनंद कुमारस्वामी इ. अशा लेखक विचारवंतांच्या भूमिकेचे संस्कार गो. पु. देशपांडे यांच्या लेखनावर झालेले दिसतात, हे निरीक्षण साळुंखे यांनी मांडलेले आहे. त्यांची ही दृष्टी म्हणून महत्त्वाची ठरते. त्यांचा हा ग्रंथ वैचारिक नाटकावर भाष्य करणाऱ्या परंपरेत महत्त्वाचा ठरतो.
सदरील पुरस्कारासाठी ०१ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२२ या मागील तीन वर्षातील साहित्यकृती विचारात घेण्यात आलेल्या आहेत. या पुरस्कारासाठी कोणत्याही साहित्यिकांकडून साहित्यकृती वा प्रवेशिका मागविण्यात आल्या नाहीत. प्रतिष्ठानने या पुरस्कारासाठी पाच साहित्यकृतिंची निवड करून त्यामधून डॅा. रमेश साळुंखे यांच्या ग्रंथाची निवड केली आहे. स्वतंत्र समारंभ घेऊन या पुरस्काराचे वितरण ॲागस्टमधे करण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रविण लुलेकर व सचिव काळवणे यांनी कळविले आहे.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत शस्त्रधारी चोरट्यांकडून धाडसी घरफोडीचा प्रयत्न

Spread the love  चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद : चोरटे धावले पोलिसांच्या अंगावर निपाणी-(वार्ता) : शहरासह उपनगरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *