३० सप्टेंबर अंतिम तारीख; बँकात होणार गर्दी
निपाणी (वार्ता) : नोटबंदी काळात चलनाची धुरा सांभाळणारी दोन हजारांची नोट गेल्या सहा वर्षांपासून चलनात आहे. मात्र सध्या ती फार कमी प्रमाणत बघायला मिळते. केंद्र सरकारने २३ मे ते ३० सप्टेंबर या कालावधीत या नोटा बँकेत जमा करण्याचे आदेश दिले आहे. आता शेवटचे ४ दिवस उरले आहेत. या चार दिवसांमध्ये गुरुवारी (ता. २८) अनंत चतुर्दशी असल्याने बँकांना सुट्टी आहे. त्यामुळे त्यामुळे नोटा बदलण्यासाठी केवळ ३ दिवस शिल्लक आहेत. परिणामी बँकांमध्ये गर्दी होणार असून नोटा लवकर बदला अन्यथा पश्चातापाची वेळ येणार आहे. याबाबतचे मेसेज निपाणी व परिसरात सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटबंदी झाल्यावर चलनात आलेली दोन हजारांची नोटचे सुरुवातीला सहज दर्शन व्हायचे. मात्र मागील काही वर्षात ती दिसेनाशी झाली. त्यामुळे ही नोट बंद होणार अशा चर्चाही होत्या. त्यातच केंद्र सरकारने घोषणा करून २३ मे ते ३० सप्टेंबर या कालावधीत या नोटा बँकेत जमा करण्याचा आदेश दिले होते. त्यातील अंतिम मुदतीला आता फक्त ३ दिवस उरले आहेत. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्याकडील दोन हजारांच्या नोटा तत्परतेने बँकेत जमा करणे हितावह ठरणार आहे.
ग्रामीण भागातील व्यवहारात दोन हजाराची नोट तिच्या जन्मानंतर फारच कमी दिसली. एखाद्याकडे दोन हाजाराची नोट दिसल्यास आतुरतेने चर्चा व्हायची. सुटे मागायला त्याला चार ठिकाणी फिरावे लागत होते. तेही देणारा काळजीपूर्वक तपासणी करूनच देत होता. भारता सारख्या देशाला दोन हजार रुपयांच्या नोट ग्रामीण भागाकरिता तरी परवडणारी नाही, असे ग्राहकातून बोलले जात होते. भ्रष्टाचाराचा मुद्दा पुढे करून नोटबंदी जाहीर केली होती. आता त्यानंतर पुन्हा दोन हजारांची नोट बंद केल्याचा निर्णय शासनाने जरी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी मुदतीत आपल्या नोट बदलावून घेणे गरजेचे आहे.
——————————————————————-
नोटबंदीने दिले कॅशलेसचे धडे
२०१६ मध्ये झालेली नोटबंदी ही कॅशलेस व्यवहाराची जननी ठरली. कारण त्यातूनच कॅशलेस व्यवहाराची संकल्पना पुढे आली. सध्या शहर व ग्रामीण भागातही ७०-८० टक्के व्यवहार हे कॅशलेस पद्धतीने केले जात आहेत. खेड्यापाड्यात सुद्धा स्मार्ट फोनच्या माध्यमातून कॅशलेस व्यवहार प्रगतीपथावर आहेत. विविध बिलासह चिल्लर व्यवहारसुद्धा मोबाईलवरून सुरू झाले आहे. एकंदरीत नोटबंदीच्या निर्णयातून कॅशलेस व्यवहार पुढे आलेले आहेत.