Tuesday , September 17 2024
Breaking News

पुलांच्या भरावामुळे गावांत शिरणार पाणी

Spread the love

 

नव्या उड्डाणपुलामुळे पाणीसाठा वाढणार

निपाणी (वार्ता) : वेदगंगा, दूधगंगा आणि चिकोत्रा या नद्यांना २०१९ पासून दरवर्षी पावसाळ्यात महापूर येत आहे. त्याचाचा फटका नदी काठावरील अनेक गावांना बसत घरांची पडझड, शेती, खासगी मालमत्तेचे नुकसान होण्यासह गावातील नागरिकांना स्थलांतरीत व्हावे लागत आहे. पुलांच्या कडेला टाकलेल्या भरावामुळे ही परिस्थिती निर्माण होत आहे. आता राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरणाच्या वेळी यमगर्णी नदी, मांगुर फाटा, कुर्ली फाट्यावर उड्डाणपूल बांधले जात असून त्या ठिकाणच्या भरावामुळे पावसाळ्यात गावात पाणी शिरण्याची समस्या मोठी होणार आहे. त्यामुळे आतापासूनच नागरिक जागृत झाले असून फुलांच्या कामाला विरोध होत आहे. भराव न टाकता बीम उभे न केल्यास आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
दरवर्षी येणाऱ्या महापुराबाबत भिवशी येथील सामाजिक कार्यकर्ते, सर्वेयर लक्ष्मीकांत पाटील यांनी कोडणी चिकोत्रा नदीपासून बेडकीहाळपर्यंत नदी काठावरील गावांचा सर्वे केला आहे. त्यामधून पुलांच्या भरावामुळेच नद्यांना महापूर येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असताना आता पुन्हा नव्याने होणाऱ्या फुलांच्या भरावामुळे महापूराची छाया आणखीन गडद होणार आहे. कोडणीपासून नदीच्या पाणी फुगवठ्याचा सर्वे केल्यानंतर सन २०१९ च्या महापुरापेक्षा सन २०२१ च्या महापुरात प्रत्येक गावात पाण्याची पातळी वाढली होती.

सर्वेनुसार कोडणीत २०१९ पेक्षा ६८७ मिलिमीटर पाण्याची पातळी वाढली आहे. चिखली गावामध्ये ६३१, बुदिहाळमध्ये ६९० मिलिमीटर, कुर्लीत ६५७ मिलिमीटर पाण्याची पातळी वाढलेली होती. यमगर्णी मध्ये २०१९ पेक्षा ६४० मिलिमीटर, सौंदलगा येथे ५२० मिलिमीटर, भिवशीत ५०७ मिलिमीटर, जत्राटमध्ये ५७७ मिलिमीटर, सिदनाळमध्ये ६७९ मिलिमीटर पाण्याची पातळी वाढली आहे. हुन्नरगीमध्ये २०१९ पेक्षा ८२९ मिलिमीटर, भोजमध्ये २२८ मिलिमीटर, कारदगा ८६ मिलिमीटर, बेडकीहाळ रस्त्यावर ३५० मिलिमीटर पाण्याची पातळी वाढली आहे.
कोडणीमधील चिकोत्रा नदीचे पाणी बुदिहाळच्या वेदगंगा नदीत मिसळते. त्यामुळे कोडणी, बुदीहाळमध्ये पाण्याचा फुगवटा तयार होतो. याला वेदगंगा नदीवर राष्ट्रीय महामार्ग निर्मिती वेळी रस्त्यासाठी टाकलेला भराव कारणीभूत ठरला आहे. या भरावामुळेच पाणी पुढे सरकण्यात अडचण निर्माण झाले आहे.
कुन्नूर मध्ये वेदगंगा, दूधगंगा नदीचा संगम झाला आहे. दोन्ही बाजूंनी आलेल्या पाण्यामुळे हुन्नरगी, सिदनाळ, जत्राट व भिवशी येथे पाण्याची पातळी वाढते. त्याला कारदगा येथे बांधलेल्या बंधाऱ्याची उंची कारणीभूत ठरली आहे. येथे सिमेंट पाईप घातल्याने तेथेही पाणी मोठ्या प्रमाणात पुढे सरकू शकत नाही. याच पद्धतीनेच बेडकीहाळ, चांदशिरदवाड रस्त्यावर पूल आहे. त्या पुलावरती केलेल्या रस्त्यावर १० ते १५ फूट भराव टाकला गेला. त्यामुळे पाण्याचा विसर्ग वेगाने होऊ शकला नाही. परिणामी पाण्याचा मागे फुगवटा निर्माण होत गेला.
भोज, कारदगा रस्त्याची उंची वाढवताना, भराव टाकला. त्यामुळे मागे पाण्याचा फुगवटा वाढू लागला. जत्राट आणि सिदनाळ नदीवर नवीन बंधारे बांधले. मात्र जुने बंधारे तसेच पडून आहेत. त्यामुळे बॅक वॉटरची समस्या निर्माण झाली. त्यामुळे जुने बंधारे काढण्याची गरज आहे. बेडकीहाळ- चांदशिरदवाड पुला जवळील भराव रस्त्याऐवजी एक हजार मीटर लांबीचा उड्डाण पूल केल्यास पाणी थांबू शकणार नाही.
——————————————————————
नागरिकांचे आंदोलनाचे हत्यार
पाऊसामुळे पडलेल्या मातीच्या गाळामुळे नदी पात्रांची खोली कमी होत चालली आहे. त्यामुळे पाणी पात्रात न राहता प्रसरण पावत आहे. भिवशी, सौंदलगा येथे पाण्याची पातळी समान वाढली आहे. मात्र कारदगा येथील रस्त्याची उंची, कारदगा बंधारा व दुधगंगा नदीचे बॅकवॉटर यामुळे हुन्नरगी, सिदनाळ या दोन गावात पाणी पातळी कमी जास्त होते. सध्या असलेल्या बंधाऱ्यांच्या भरावामुळे अशी परिस्थिती असून आता नवीन बंधारे आणि भराव झाल्यास पावसाळ्यात पुरांची परिस्थिती गंभीर बनणार आहे. त्याची दखल घेऊन कुरली,बुदिहाळ, यमगर्णी परिसरातील नागरिकांनी आतापासूनच आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्याला प्रशासनाचा कितपत प्रतिसाद मिळतो, हे आता थांबूनच पहावे लागणार आहे.
——————————————————————-

आशा आहेत उपाय योजना
* जुने बंधारे नदीतून काढून टाकणे
* नवीन बंधाऱ्यासह नदीतील गाळ काढणे
* भराव टाकून केलेल्या रस्त्याच्या ठिकाणी उड्डाणपूल तयार करणे
* कारदगा येथे होणाऱ्या पुलाच्या ठिकाणी भराव टाकून रस्ता न करता उड्डानपूल करावा
* नदीपात्रात जास्त होणारे पाणी कॅनॉलमध्ये सोडावे
* कॅनॉलमुळे अधिक ओलिताखाली येईल
* जमिनीतील भूजल पातळी वाढण्यास मदत होईल
——————————————————————–

‘सन २०१९ व २०२१ मधील महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले. गावातील नागरिकांना संसारा सह स्थलांतरित व्हावे लागले. घर मालमत्तेचे नुकसान या सर्वांचा विचार करून सामाजिक जाणिवेतून आपण हा कोडणी पासून बेडकीहाळ पर्यंत सर्वे केला. त्यासाठी आत्याआधुनिक डी. जी. पी. एस मशीनचा वापर करण्यात आला. सर्वेसाठी आलेला खर्च सामाजिक बांधिलकी जपत स्वतः केला आहे. या सर्व्हेसाठी राहुल पाटील, शिवाजी सनदी व बजरंग बेनाडे यांचे सहकार्य लाभले.’
लक्ष्मीकांत पाटील, सामाजिक कार्यकर्ते, भिवशी

About Belgaum Varta

Check Also

पुर्वीप्रमाणे पाणी बील आकारणीचा पहिला ठराव मंजूर करावा

Spread the love  निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेच्या नुतन पदाधिकाऱ्यांची पहिली सर्व साधारण सभा मंगळवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *