मंत्री अश्वत्थ नारायण : देशात पहिलाच उपक्रम, ’स्टार्टअप दिना’चे आयोजन
बंगळूर (वार्ता) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून, अतिरिक्त 75 नवोद्यमींसह राज्यात एकूण 200 नवोद्यमीना यावर्षी जास्तीत जास्त 50 लाख रुपये मूल निधी (सीड फंड) देण्यात येईल, असे आयटी, बीटी आणि कौशल्य विकास मंत्री डॉ. सी. एन. अश्वथ नारायण यांनी सांगितले.
विधानसभेत रविवारी आयोजित पहिल्या ’राष्ट्रीय स्टार्टअप दिना’च्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, राज्यात आतापर्यंत अंदाजे 500 स्टार्टअपना अनुदान देण्यात आले आहे. मूल निधी देण्याचा उपक्रम अन्य राज्यात नाही, असे ते म्हणाले.
चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत राज्यात उद्योगांच्या स्थापनेसाठी 1.60 लाख कोटी रुपयाचे विदेशी भांडवल आले आहे. देशातील एकूण गुंतवणुकीपैकी 50 टक्यापेक्षा जास्त कर्नाटकचा वाटा आहे. देशात एकूण 57 हजार नवीन उद्योजक आहेत. राज्यात 13,000 हून अधिक स्टार्टअप कार्यरत आहेत. राज्यात राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे हे अव्वल स्थान राखून ठेवण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश ’विश्वगुरू’ आणि ’महासत्ता’ म्हणून उदयास येण्यामध्ये नवनिर्मितीच्या भूमिकेवर भर दिला. हे लक्षात घेऊन राज्याच्या हार्डवेअर क्षेत्राचाही सक्षमपणे विकास केला जाणार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने बंगळुर येथे उभारलेले आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड रोबोटिक्स ट्रान्सलेशन पार्क (आर्ट पार्क) हे या बाबतीत राज्य सरकारच्या वचनबद्धतेचे उदाहरण आहे.
राज्यात इलेक्ट्रॉनिक व्यवसायांना चालना देण्यासाठी पुढील पाच वर्षांत ईएसडीएम धोरणांतर्गत पाच हजार कोटी रुपये अनुदान (सबसीडी) दिले जाईल. पहिल्या वर्षी दोन हजार कोटी रुपये अनुदान देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
स्टेट स्टार्टअप व्हिजन ग्रुपचे प्रमुख प्रशांत प्रकाश म्हणाले, आम्ही फक्त स्वत:साठी उत्पादने बनवतो. चीनप्रमाणेच संपूर्ण जगाच्या गरजा लक्षात घेऊन बाजारपेठ वाढवली पाहिजे. बंगळुर आता देशाची आर्थिक राजधानी बनली आहे.
या कार्यक्रमात बोलताना, आयटी-बीटी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ई. व्ही. रमण रेड्डी म्हणाले, गेल्या 20 वर्षांत आमची व्यवसाय व्यवस्था आमूलाग्र बदलली आहे. उद्योजकतेतील नवीन कल्पना वेगाने ओळखल्या जात आहेत आणि आवश्यक सहाय्य आणि सुविधा पुरवल्या जात आहेत.
याप्रसंगी बोलताना, आयटी आणि बीटीच्या संचालक मीना नागराज म्हणाल्या, राज्यात नावीन्यपूर्णतेला पोषक अशी अनेक धोरणे आहेत.
14 नवोद्यमीना पुरस्कार
भारतातील पहिल्या ’स्टार्ट अप इंडिया इनोव्हेशन सप्ताह’मध्ये राज्यातील 14 नवीन उपक्रमांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. ते म्हणाले की, 46 नवकल्पनांना राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार देण्यात आला, त्यापैकी सिंहाचा वाटा (14) कर्नाटकात आहे.
नाफा इनोव्हेशन्स, उंबो आयडी टेक (फीनटेक), थिंकर बेल लॅब्स, सिंप्लोटेल टेक्नॉलॉजी, (ट्रॅव्हल्स अँड हॉस्पिटॅतिटी), ब्लिंकीन टेक्नॉलॉजी (ऑग्मेंटेड रियालिटी), टॅग बॉक्स सोलुशन्स, शॉपसर्व्हीसेस, सर्व्हीसेस प्रा. (कृषी), लीड स्क्वेअर (ग्राहक संबंध), ल्युसिन रिच बायो प्रा. (जीवशास्त्र), स्टील ऑप्स (पशुसंवर्धन), वन ब्रिज (लॉजिस्टिक्स) आणि स्टेरेडियन सेमी (ट्रान्सपोर्टेशन मॅनेजमेंट) – या पुरस्कार विजेत्या कंपन्या आहेत.
Check Also
अभियंता अतुलकडून निकीता मागत होती 80 हजार रुपये मेंटेनन्स
Spread the love बेंगळुरू : अभियंता अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांची पत्नी निकिता सिंघानिया हिच्यासह …