Thursday , November 21 2024
Breaking News

विश्व विख्यात दसरा महोत्सवासाठी म्हैसूर शहर सज्ज

Spread the love

 

आज होणार उद्घाटन; देश-विदेशातील पर्यटक शहरात दाखल

बंगळूर : म्हैसूर पॅलेस (राजवाडा) दहा दिवसांच्या जगप्रसिद्ध दसरा उत्सवासाठी सज्ज झाला आहे. पारंपारिक दसरा किंवा नवरात्रीच्या उत्सवासाठी विद्युत रोशणाईने नव वधूप्रमाणे नटलेल्या म्हैसूर शहरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनाची लगबग सुरू झाली आहे. या भव्य-दिव्य सोहळ्याचा आनंद लुटण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक आधीच शहरात येऊन दाखल झाले आहेत.
‘नाड हब्ब’ हा एक उत्सव आहे, जो कर्नाटकची समृद्ध संस्कृती आणि परंपरा प्रतिबिंबित करतो आणि राजघराण्याच्या वैभवाचे स्मरण करतो. राज्यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण मानला जाणारा, दसरा हा तत्कालीन म्हैसूर राजघराण्यातील राजांच्या नेतृत्वाखाली जनतेचा उत्सव बनला.
देशाच्या स्वातंत्र्यानंतर आणि प्रजासत्ताकानंतर, परंपरांना चालना देत, कर्नाटक सरकारच्या आश्रयाने तो आजही साजरा केला जात आहे.
३ ऑक्टोबर रोजी चामुंडी टेकडीवरील चामुंडेश्वरी मंदिर परिसरात सकाळी ९-१५ ते ९-४५ दरम्यान साहित्यिक नागराजय्या देवी चामुंडेश्वरीला पुष्प अर्पण करून दसऱ्याचे उद्घाटन करतील. उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री सिद्धरामय्या, अनेक मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
१० दिवस चालणाऱ्या दसरा महोत्सवात दरवर्षीप्रमाणे लोककला प्रकारांसह कर्नाटकच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडते. अधिका-यांनी सांगितले की, हा महोत्सव देश विदेशातील लोक आणि पर्यटकांना आकर्षित करतो.
राज्यातील चांगला पाऊस पाहता यंदा दसरा भव्य आणि अर्थपूर्ण पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सिद्धरामय्या यांनी नुकतेच सांगितले होते. नवरात्रीच्या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. या काळात म्हैसूरचा राजवाडा, प्रमुख रस्ते, चौक आणि इमारती “दीपलंकारा”ने झगमगत आहेत. राज्यभरातील ५०८ मंडळांच्या कलाकारांसह सुमारे ६,५०० कलाकार यावेळी दसऱ्याच्या दरम्यान सुमारे ११ वेगवेगळ्या व्यासपीठांवर आपल्या कलांचे सादरीकरण करणार आहेत.

म्हैसूर दसरा २०२४
पहाटे ३ ते ११ या वेळेत राजवाड्यात खासगी दरबार, जंबो राइड १२ वाजता,
तसेच खाद्य मेळा, फळे आणि फुलांचे प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, शेतकरी दसरा, महिला दसरा, युवा दसरा, बाल दसरा आणि काव्यवाचन देखील आयोजित केले जाणार आहे. मुख्य आकर्षण म्हणजे रोषणाईने नटलेल्या अंबाविलासा पॅलेससमोर होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, हे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध कलाकारांच्या सादरीकरणाचे प्रमुख व्यासपीठ असेल. प्रतिष्ठेचा राज्य संगीत विद्वान पुरस्कार येथे मुख्यमंत्री प्रदान करतील.
प्रसिद्ध दसरा जंबो सवारी मिरवणूकीत व मिरवणुकीतील कला प्रदर्शनात अनेक लोक सहभागी होतात. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार यंदा एअर शो होणार नाही. नवरात्रीच्या निमित्ताने म्हैसूर आणि परिसरातील घरांमध्ये बाहुल्यांच्या सजावटीसह विविध विधी केले जातात. राजवाड्यात राजे लोक त्यांच्या परंपरेनुसार सण साजरे करतात.
म्हैसूर राजघराण्याचे वंशज यदुवीर कृष्णदत्त चामराज वोडेयार, वैदिक स्तोत्रांच्या गजरात रत्नजडित सिंहासनावर चढून प्रभाया दरबार (खासगी दरबार) आयोजित करतात. वज्रमुष्टी हा राजवाड्यातील विधीचा भाग आहे.
नवरात्रीच्या १० व्या दिवशी विजयादशमीला जगप्रसिद्ध जॅम्बोसवारी हे मुख्य आकर्षण आहे. अभिमन्यू हत्ती सोन्याच्या अंबरीत विराजमान देवी चामुंडेश्वरीची मूर्ती बन्निमंटपाकडे घेऊन जाईल. अभिमन्यू इतर हत्तींसोबत असेल. म्हैसूर दसरा १२ ऑक्टोबर रोजी बन्निमंटप येथे कवायत सादरीकरणासह सुरू होईल. दहा दिवस चालणाऱ्या दसरा उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सर्वत्र करडी नजर ठेवून आहेत.

About Belgaum Varta

Check Also

9 ते 20 डिसेंबर दरम्यान कर्नाटकचे हिवाळी अधिवेशन

Spread the loveबेळगाव : येत्या 9 ते 20 डिसेंबर दरम्यान सुवर्ण विधान सौध येथे राज्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *