बेंगळूर : कर्नाटकच्या ग्रामीण भागात कोरोनाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी बुधवारी सकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे निवडक ग्रामपंचायतींसह अधिकाऱ्यांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. यांनतर कोरोना संकटात योगदान देऊ इच्छिणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचा सहभाग अधिक सोपा व्हावा यासाठी नियोजन खात्याने ‘आकांक्षा’ पोर्टल सुरु केले आहे. बुधवारी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी व्हर्च्युअल पद्धतीने या पोर्टलचे अनावरण केले.
या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला बेळगावातून जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, आरोग्य, बागायत व अन्य खात्यांचे अधिकारी तसेच इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे पदाधिकारी सहभागी झाले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री येडियुराप्पा म्हणाले, कोरोना निवारणात स्वयंसेवी संस्थांचा सहभाग अधिक सोपा व्हावा यासाठी कर्नाटक सरकारने आकांक्षा इंटिग्रेटेड ऑनलाईन पोर्टल तयार केले आहे. राज्यात कोरोना निवारणासाठी कृतीदल कार्यरत असून, त्याद्वारे रुग्णांना योग्य उपचार देण्यासाठी सर्व उपाय करण्यात येत आहेत. जिल्ह्यात लाभार्थ्यांना लसीकरण, कोविड उपचारांसाठी केंद्रांची उभारणी करण्यात येत आहे. लॉकडाउनच्या संकट सापडलेल्यांसाठी सरकारने १२५० कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर केले आहे. तसेच लवकरच दुसरे पॅकेजही जाहीर करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी संकेत दिले आहेत. राज्याला लवकरात लवकर कोरोनमुक्त करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी आपले योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ म्हणाले, राज्याला कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी हे पोर्टल उपयोगी पडणार आहे. राज्यात कोरोनाची आणीबाणीची परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आकांक्षा इंटिग्रेटेड ऑनलाईन पोर्टलवर कोणत्या रुग्णालयात कशाचा अभाव आहे, त्या ठिकाणी काय सुविधा उपलब्ध आहेत याची माहिती दर तासाला अपडेट होत राहणार आहे. त्यामुळे स्वयंसेवी संस्थांना कशाप्रकारची मदत करायची याचे आकलन होणार आहे.