कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कडक लॉकडाऊन रात्री संपताच आज सकाळी सात ते अकरा दरम्यान ग्राहकांनी खरेदीसाठी झुंबड उडवली. भाजीपाल्यासह धान्य, आंबे, चक्क वडापाव घेण्यासाठी सुद्धा ग्राहकांनी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी रास्त धान्य भाव दुकानांसमोर रांगा लावल्या होत्या. एकंदरीतच कडक लॉकडाऊन शिथिल झाल्याचा परिणाम आज सकाळी दिसून आला.
शहरातील मुख्य बाजार असणाऱ्या ठिकाणी भाजीपालासह इतर विक्रीसाठी बंदी घालण्यात आली आहे. मात्र रस्त्याच्या कडेला थांबून विक्री करण्यासाठी भाजी विक्रेत्यांना परवानगी आहे. परिणामी शहरातील ठिकठिकाणी रस्त्यावर गर्दी जाणवत होती. शिंगोशी मार्केट परिसरातील फुलबाजार सुद्धा आज मिरजकर तिकटी परिसरातील रस्त्यावरच भरला होता. सकाळच्या टप्प्यात वीस- पंचवीस रुपये किलोने मिळणारा गलाटा साडेनऊ दहा नंतर 30 ते 40 रुपये करण्यात आला.
कोळेकर तिकटी मिरजकर तिकटी याठिकाणी पोलिस स्वतः थांबून रस्त्याकडील पांढऱ्या पट्ट्याच्या बाहेरच विक्रीसाठी थांबू देत होते मात्र ग्राहक दुचाकीसह विक्रेत्यांना समोर थांबत असल्याने अधिक गर्दी जाणवत होती. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या लक्ष्मीपुरी भाजी मंडईमध्ये मात्र गर्दीच गर्दी होती. बिंदू चौकाकडून आईसाहेबांच्या पुतळ्याकडे जाणारा मार्ग खोदाईसाठी बंद असल्याने सर्व वाहतूक शिवाजी पुतळा मार्गे वळविण्यात आली होती, त्यामुळे ही काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.
मुख्य लक्ष्मीपुरी बाजारात मात्र पोलिस दिसत होते. ज्याठिकाणी अधिक गर्दी होत होती तेथील ग्राहकांना सूचना देऊन बाजूला घेण्याचे काम हे पोलिस करीत होते. राजारामपुरी परिसरातील आईचा पुतळा परिसरात नार्वेकर मार्केट मधील विक्रेते रस्त्याच्या दुतर्फा विक्रीसाठी बसले होते. त्यामुळे त्या परिसराची ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती. तसेच शहरातील ठिकाणी कोपऱ्यावर आंबे विक्रेत्यांनीही गर्दी केली होती. काही भाजी विक्रेत्यांनी उपनगरातही भाजीचे स्टॉल उभा केले होते. तेथेही तुरळक ग्राहक दिसत होता.