बेळगाव : वडगावातील यरमाळ रस्त्यालगत लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. येथील वीजखांब आणि त्यावरील डीपी खराब झाले असून, अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत. त्यावरील वीजवाहक तारा तुटून इतक्या खाली आल्या आहेत की, जाणा–येणाऱ्यांच्या हाताला सहज स्पर्श होऊ शकतो. पाऊस-वाऱ्यामुळे काही तारा खांबांना जाऊन चिकटल्या आहेत. त्यामुळे कोणाचा चुकून जरी खांबाला स्पर्श झाला तर विजेचा धक्का बसून जीवावर बेतू शकते अशी स्थिती आहे. त्यामुळे हेस्कॉम आणि महानगरपालिकेने तातडीने येथील वीजखांब आणि डीपी बदलावेत अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना मनोहर शिरोडकर यांनी सांगितले की, यरमाळ रस्त्यावरील नादुरुस्त वीजखांब, डीसी आणि तूटलेल्या वीज तारांमुळे लोकांच्या जीवाला अपाय निर्माण झाला आहे. याबाबत हेस्कॉमला अनेकवेळा कळवूनही काही उपयोग झालेला नाही. पावसाळ्यात पाणी डीपीमध्ये जाऊन आणखी मोठा धोका संभवू शकतो. त्यामुळे हेस्कॉम आणि महानगरपालिकेने तातडीने येथील वीजखांब आणि डीपी बदलावेत अशी मागणी केली.
पावसाळ्याच्या तोंडावर संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी हेस्कॉमने या बाबत लक्ष घालून खराब वीजखांब, डीपी आणि तुटलेल्या वीजवाहिन्या बदलाव्यात अशी मागणी वडगाव यरमाळ रस्त्यावरील रहिवाशांनी केली आहे.