नवी दिल्ली : केरळच्या दक्षिण भागात मान्सून आज सक्रिय झाला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मान्सून केरळमध्ये दोन दिवस उशिरा दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासूनच दक्षिण-पश्चिम मान्सून केरळमध्ये पोहचणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. अखेर आज केरळमध्ये यंदा मान्सून सामान्य परिस्थितीपेक्षा थोड्या उशिराने का होईना दाखल झाला आहे. यंदाचा मान्सून पाऊस सरासरीच्या सामान्य राहिल, असा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीच वर्तवला आहे.
भारतीय हवामान विभागाने यापूर्वी मान्सून केरळमध्ये 1 जूनला दाखल होईल, असे सांगितले होते. मात्र, त्यानंतर 31 मे रोजी मान्सून दाखल होईल, असे सांगण्यात आले. त्यानंतर भारतीय हवामान विभागाने पुन्हा नवीन माहिती देत 3 जूनला मान्सून दाखल होईल, असे सांगितले होते. त्याप्रमाणे मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे.
दरवर्षी साधारणपणे मान्सून 1 जूनला दाखल होतो, यंदा दोन दिवस उशिराने केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने मान्सून दक्षिण अरबी समूद्र, लक्षद्वीप, दक्षिण केरळ, दक्षिण तामिळनाडू, कोमोरिन मालदिव भागात सक्रिय झाल्याचे सांगितले आहे.