महाराष्ट्र एकीकरण युवा समितीमार्फत गडहिंग्लज तालुका प्रशासनाला निवेदन
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती मार्फत गडहिंग्लज तालुका प्रशासनाला गडहिंग्लज सीमेलगत कर्नाटक हद्दीतील गावांना सुद्धा रुग्णालय सेवा उपलब्ध करून द्यावी याबाबत निवेदन देण्यात आले.
गडहिंग्लज हा महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असणारा तालुका आहे, कर्नाटक सीमेवरील बहुतांश गावांचे नागरिक बाजार आणि रूग्णालयासाठी गडहिंग्लज तालुक्यावर अवलंबून आहेत, पण सध्या लॉकडाऊनमुळे दोन राज्याच्या सीमा बंद असल्याने सीमेवरील गावातील रुग्णाचे हाल होत आहे, त्यांना 60-70 किलोमीटर दूर बेळगावला यावे लागत आहे. सध्या महाराष्ट्रमधील रुग्णसंख्येत घट होत असला तरीही बेळगाववरील आरोग्यसेवेरील ताण अजून कमी झाला नाही आणि म्हणून सीमेवरून येणाऱ्या रुग्णांना योग्य आरोग्यसेवा मिळणे अवघड झाले आहे, तेव्हा तुमच्यामार्फत महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालय आणि शासनमान्य रुग्णालये सीमेलगतच्या रुग्णांसाठी उपलब्ध करवून द्यावीत आणि त्यासाठी सीमेवरील गावकऱ्यांना सीमेवरून येण्यास परवानगी द्यावी. आणि त्यांना योग्य आरोग्यसेवा मिळावी अश्या आशयाचे निवेदन गडहिंग्लज उपजिल्हाधिकारी विजया पांगारकर, नगराध्यक्षा सौ. स्वाती महेश कोरी आणि उपविभागीय अधिकारी नागेंद्र मुतकेकर तसेच यांच्या मार्फत मा.जिल्हा पालकमंत्री श्री. सतेज पाटील, मा.जिल्हाधिकारी कोल्हापुर, मा.मुख्याधिकारी गडहिंग्लज यांना देण्यात आले.
यावेळी उपनगराध्यक्ष श्री. महेश कोरी, नगरसेवक नरेंद्र भद्रपूर, गुरुनाथ मोरे हेही उपस्थित होते.
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने अध्यक्ष श्री. शुभम शेळके, कार्याध्यक्ष सुरज कुडूचकर, उपाध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष अंकुश केसरकर, खजिनदार मनोहर हुंदरे, दक्षिण संघटक राजू कदम, ग्राम पंचायत सदस्य निर्मल धाडवे, संतोष कृष्णाचे आकाश भेकणे आदी उपस्थित होते.