चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्यातील उमगाव येथील जिओ टॉवर अनेक वर्ष उभारूनही आजतागायत बंद असल्याने प्रशासन व कंपनीविषयक निषेध व्यक्त करत शेकडो युवकांनी एकत्र येत निषेध आंदोलन केले.
गेली कित्येक वर्षे या जांबरे भागात नेटवर्क टॉवर नसल्याने सर्व ग्रामस्थ व युवावर्गाची गैरसोय होत आहे. या भागात अनेक गावे येत असून येथील ग्रामस्थांना अनेक अडचणी येत आहेत.
मुलांना ऑनलाईन क्लास, शिक्षण, खाजगी कामे, शासकिय कागदपत्रे न मिळणे, मोबाईल सुविधेचा वापर न होणे यांसारख्या अनेक अडचणी येत असल्यामुळे या भागांतील युवकांनी आपला आक्रोश या निषेध आंदोलनातून माध्यमाशी बोलताना व्यक्त केला. उमगाव, पेडणेकरवाडी, न्हावेली, सावतवाडी, जांबरे या गावातील युवकांनी एकत्र येत या बंद असलेल्या जिओ टॉवरसमोर नाराजी व्यक्त करतं प्रशासन, राज्यसरकार व जिओ कंपनीला सज्जड ईशारा दिला आहे.
येत्या पंधरा दिवसांत जर जिओ नेटवर्क टॉवरसंदर्भात निर्णय घेण्यात आला नाही तर टॉवर पाडला जाईल असे येथील युवावर्गातून रोष व्यक्त करत सांगण्यात आले. यावेळी चंद्रकांत गावडे, अनिल पेडणेकर, विजय पाटील, जयसिंग हाजगूळकर, विश्वनाथ देवणेे, ज्ञानेश्वर धुरीसह आदी शेकडो युवक उपस्थित होते.