बेंगळुरू : पुरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटक राज्याचे पाण्याची आवक-जावक, पाणीसाठा याबाबतची अलमट्टीवर डायनॅमिकल कंट्रोलसाठी आधुनिक रियल टाईम डाटा यंत्रणा बसवावी, अशी सूचना महराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बंगळूरमध्ये झालेल्या बैठकीत केली. ती त्यांनी मान्य केल्याची माहिती मंत्री पाटील यांनी तातडीने सोशल मिडियावर जाहिर केली आहे. संभाव्य पूरस्थितीवरील उपाययोजनांबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्यात बंगळूरमध्ये सकाळी बैठक झाली. या बैठकीस दोन्ही राज्यांचे मुख्य सचिव व जलसंपदा पाटबंधारे अधिकारी उपस्थित आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या बंगळूर येथील निवासस्थानी ही बैठक झाली. सातारा, सांगली भागात महापुराची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या पुढाकाराने बैठक झाली. गत वर्षी देखील राज्याच्या जलसंपदा विभागाने पाण्याचे सुव्यवस्थित नियोजन करून पूर परिस्थिती टाळली होती. पूर परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी ही भेट होत असल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.
बैठकीनंतर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले की, दोन्ही राज्यांनी येत्या पावसाळ्यात समन्वयाने पूर परस्थितीवर मात करण्याचे ठरले. राज्यात डायनॅमिक पध्दतीने रियल टाईम डाटा यंत्रणा उपलब्ध आहे. त्याप्रमाणे कर्नाटक राज्यानेही डायनॅमिक पध्दतीने रियल टाईम डाटा यंत्रणा बसवण्याची सूचना केली. त्यास कर्नाटकने सहमती दर्शवली आहे. यामुळे अलमट्टी धरणातील आवक-जावक यांची माहिती तातडीने दोन्ही राज्यांना मिळेल. अलमट्टीपुढील नारायणपूर येथील बंधाऱ्यापर्यंत पुराच्या पाण्यांचेही नियंत्रण करणे शक्य होणार आहे.
भीमा व कृष्णा खोऱ्यातून होणारा विसर्ग व त्याच्या माहितीचे आदान-प्रदानाची यंत्रणा, धरण व्यवस्थापन व पूर नियंत्रणाबाबत संयुक्त आराखडा व कार्यप्रणाली निश्चितीवर चर्चा झाली. महाराष्ट्र सरकारने खोऱ्यातील आधुनिक यंत्रणेव्दारे रियल टाईम डाटा यंत्रणा बसवली आहे. याचा फायदा आवक-जावक यासह कोणत्या धरणातून किती पाणी सोडावे लागणार आहे याचे नियोजन करणे सोपे होईल, यावर बैठकीत चर्चा झाली.
बैठकीस राज्यातील विजय कुमार गौतम, सचिव ए. पी. कोहीरकर, सहसचिव ए. ए. कपोले, मुख्य अभियंता हणमंत गुणाले, अधिक्षक अभियंता मिलींद नाईक तर कर्नाटक राज्याचे गृहमंत्री ना. बोम्मई, मुख्य सचिव राकेश सिंग, प्रधान सचिव मंजुनाथ प्रसाद, मुख्य सल्लागार अनिल कुमार, जलसंपदा सचिन लक्ष्मणराव पेशवे, कार्यकारी संचालक मल्लिकाजुर्न गुंगे हे प्रमुख बैठकीस उपस्थित आहेत.