महावीर बोरण्णावर : शहरात विविध ठिकाणी लसीकरण
निपाणी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनातर्फे शहर आणि ग्रामीण भागात लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. अजूनही नागरिकांमध्ये लसीकरणाची भीती व्यक्त होत आहे. पण कोरोनापासून दूर राहण्यासाठी प्रत्येकांनी न घाबरता लस घेतली पाहिजे. सध्या शहर आणि परिसर अनलॉक झाला असून नागरिकांनी सोशल डिस्टन्स, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन नगरपालिका आयुक्त महावीर बोरण्णावर यांनी केले. शहरातील विविध प्रभागात कोरोना लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला त्यावेळी आयोजित जनजागृती कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी महात्मा गांधी हॉस्पिटलच्या वैद्य अधिकारी डॉ. सीमा गुंजाळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी शहरातील प्रभागात पथनाट्याद्वारे कोरोना लसीकरणाचे महत्त्व शहरवासीयांना पटवून देण्यात आले. डॉ. गुंजाळ यांनी, निपाणी शहर आणि ग्रामीण भागात सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. परिणामी अनलॉक करण्यात आला असून नागरिकांनी बाजारपेठेसह येथे ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन केले.
महिला व बालविकास मंत्री शशिकला जोल्ले, खासदार आण्णासाहेब जोल्ले यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना केलेल्या विनंतीनुसार निपाणी शहरामध्ये 18 वर्षावरील सर्वानाच महात्मा गांधी हॉस्पिटल, कोल्हापूर वेस आरोग्य उपकेंद्र, गटशिक्षणाधिकारी कार्यालय, रोटरी क्लब, जय मल्हार सांस्कृतिक भवनसह एकूण 5 ठिकाणी लसीकरण करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्षा नीता बागडे, सभापती सद्दाम नगरजी, नगरसेविका उपासना गारवे, नगरसेवक संतोष सांगावकर, आशा टवळे, महेश सूर्यवंशी, निपाणी भाजपाध्यक्ष प्रणव मानवी, बंडा घोरपडे यांच्यासह नगरपालिका पदाधिकारी उपस्थित होते.