बेळगाव : महाराष्ट्रात कमी पाऊस झाला आहे. त्याचप्रमाणे कोयना जलाशय परिसरात देखील कमी पाऊस पडल्यामुळे सध्या बेळगाव जिल्ह्याला पुराचा धोका नसल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी दिली.
कोरोना प्रादुर्भाव आणि पूर परिस्थिती संदर्भात चिकोडी तालुक्यात पाहणी दौरा केल्यानंतर आज बुधवारी सकाळी बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री कारजोळ यांनी उपरोक्त माहिती दिली.
वेदगंगा आणि दुधगंगा या नद्यांची पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्याला येत्या 15 जुलैपर्यंत पुराची भीती नाही असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी परस्पर समझोता झाला आहे. त्यानुसार बेळगावला पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळ्यात महाराष्ट्र 4 टीएमसी पाणी देणार आहे. त्याचप्रमाणे आम्हाला महाराष्ट्रातील जत तालुक्याला 4 टीएमसी पाणी द्यावे लागणार आहे.
तसेच यापुढे कोयना जलाशयाचीद्वारे खुली करण्यापूर्वी महाराष्ट्राला त्याची पूर्वकल्पना कर्नाटकला द्यावी लागणार आहे. त्यामुळे पूर परिस्थितीचे व्यवस्थापन करणे सुलभ जाणार आहे, असेही जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी स्पष्ट केले.