जि. पं. सदस्य रमेश गोरल यांच्या प्रयत्नांना यश
बेळगाव : देसुर ग्रामस्थांनी स्वखर्चातून बसविलेल्या दिशादर्शक फलकाची अज्ञातांनी नासधूस करून काढून टाकण्यात आला होता. त्यामुळे मराठी भाषिकातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याला जाग आली आणि त्यांनी कायमस्वरूपी सरकारी दिशादर्शक फलक उभा केला.
गेल्या कित्येक महिन्यापासून निवेदने देऊन सुद्धा येळ्ळूर-सुळगा मार्गावर दिशादर्शक फलक न बसविल्याने देसुर गावातील सामाजिक कार्यकर्ते रणजित पोटे आणि सहकाऱ्यांनी स्वखर्चातून दिशादर्शक फलक बसविला होता. परंतु काही मराठीद्वेष्ट्यानी सदर फलकाची नासधूस करून फलक उचकटून टाकला होता, परंतु जि. पं. सदस्य रमेश गोरल यांच्या पुढाकाराने नासधूस केलेला फलक पुन्हा पूर्ववत बसविण्यात आला. त्यानंतर तात्काळ रमेश गोरल यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला निवेदन देऊन कायमस्वरूपी दिशादर्शक फलक बसविण्याची विनंती केली होती. या विनंतीची दखल घेत संबंधित खात्याने येळ्ळूर सुळगा क्रॉस वर शासकीय दिशादर्शक फलक बसविला आहे. विशेष म्हणजे सदर फलकावर गावांच्या नावाचा उल्लेख कानडीसह मराठी भाषेतही केला आहे. त्यामुळे मराठी भाषिकातून समाधान व्यक्त होत आहे. याचे सर्व श्रेय जि. पं. सदस्य रमेश गोरल यांचे आहे.