चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : मुख्याध्यापिकेच्या सेवनिवृत्तीनिमित्त ग्रंथतुला करून बालसाहित्य व शालेय पुस्तके भेट देत अनोख्या पद्धतीने निरोप समारंभ दाटे (ता.चंंदगड) केंद्रशाळेत पार पडला. मुख्याध्यापिका मंगल भोसले यांचा मुलगा अवधूत भोसले व कन्या दिपीका भोसले यांनी हे अभिनव पाऊल उचलत शालेय साहित्य संपदेस सहकार्य केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सर्व नियमांचे पालन करुन भोसलेताई यांचा सत्कार व शुभेच्छा कार्यक्रम पार पाडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दाटे ग्रामपंचायतीचे सरपंच अमोल कांबळे उपस्थित होते. याप्रसंगी मंगल भोसले मॅडम यांची ग्रंथतुला करुन शाळेला सुमारे 35 हजार रुपयांची बालसाहित्य व शालोपयोगी पुस्तके भेट दिली. यावेळी केंद्रशाळा दाटे, शिक्षकवृंद, शालेय कमिटी तसेच इतर मान्यवर यांचेकडून शाल, साडी, श्रीफळ, पुष्पहार व भव्य सरस्वतीची मुर्ती देवून सत्कार करण्यात आला. तसेच शिक्षक समिती चंदगड व रयत फौंडेशन दाटे यांचेमार्फत मानपत्र देवून सन्मानित करणेत आले.
चंदगड पंचायत समितीचे शिक्षणविस्तार अधिकारी एम.टी.कांबळे यांनी आपले वडील कै.तुकाराम कांबळे यांचे स्मरणार्थ केंद्रशाळेच्या आवारात बांधलेल्या भव्य स्टेजचे उदघाटन त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई कांबळे यांचे हस्ते फित कापून केले.
यावेळी गटशिक्षणाधिकारी सुमन सुभेदार म्हणाल्या की, मंगल भोसले यांनी शिक्षण क्षेत्राला वाहून विद्यार्थी व शाळांना एक वेगळी उंची प्राप्त करुन दिली. केंद्रशाळा दाटे आणि वि.मं.दौलत हलकर्णी (ता.चंदगड)चे विद्यार्थी व पालक त्यांची सर्वोच्च सेवा कधीही विसरु शकणार नाहीत.
याप्रसंगी शिक्षणविस्तार अधिकारी एम.टी.कांबळे म्हणाले की, शिक्षणसेवेचा सर्वोच्च अविष्कार म्हणजे मंगल भोसले, केंद्रप्रमुख जी.बी.जगताप म्हणाले की, शिस्त, कर्तव्यकठोरता आणि सेवाभाव याचा एक उत्कृष्ठ नमुना म्हणून मंगल भोसले यांचे कार्य सर्वांसमोर राहील. यांवेळी मंगल भोसले यांच्या कार्याचे गौरवोद्गार शालेय कमिटी अध्यक्ष परशराम सातार्डेकर, धनाजी पाटील (अध्यक्ष शिक्षक समिती,चंदगड), प्रकाश बोकडे, शिल्पा तुर्केवाडकर, गोपाळ डुरे, श्रेयस, द.गू.कदम, विद्यार्थिनी प्रज्ञा देसाई व इतर मान्यवरांनी कौतूक केले.