वाहनांची काटेकोर तपासणी : तालुक्याला मिळतोय दिलासा
निपाणी (संजय सूर्यवंशी) : महाराष्ट्र – कर्नाटक सीमेवरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील कोगनोळी सीमा तपासणी नाका हा महत्वाचा असून गेल्या अडीच महिन्यापासून हा नाका केंद्रबिंदू बनला आहे. परराज्यातून येणार्या सर्वच वाहनासह नागरिकांची तपासणी करून सीमा बंदी कठोर केली आहे. त्यामुळेच कर्नाटकात कोरोनाचा अटकाव झाला आहे. शिवाय निपाणी तालुक्यालाही दिलासा मिळाला आहे.
कोरोना या संसर्ग रोगाच्या पार्श्वभुमीवर केंद्रशासन व राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे येथील आंतरराज्य सीमा बंद ठेवून या नाक्यावर विविध खात्यांचे अधिकारी चोख सेवा बजावत आहेत. त्यामुळेच महाराष्ट्राच्या तुलनेत कोरोनाचा फैलाव आटोक्यात आहे. येथील अधिकार्यांनी व कर्मचार्यांनी बजावलेली सेवा पारदर्शक असल्याने गुप्तचर अहवालातही या नाक्यावरील कामकाजाबद्दल कौतुक करण्यात आले आहे.
कोरोना बाधितांच्या राज्यातील वाढत्या आकडेवारीवर अंकुश ठेवण्यासाठी विशेष खबरदारी म्हणून कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातून रस्ते मार्गाने येणार्या सर्व प्रकारच्या वाहनांवर बंदी घातली होती. इतर राज्यातून कर्नाटकात मोठ्या संख्येने नागरिक परतु लागल्याने कर्नाटकामध्ये कोरोना बाधितांचा आकडा वाढू नये, यासाठी सुरक्षिततेचा उपाय म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र – कर्नाटक सीमारेषा कठोर करण्यात येत आहेत. अनेकांना कर्नाटकात प्रवेश न मिळाल्याने पुणे, मुंबई व अन्य भागातील नागरिकांना परत जावे लागत आहे.
कर्नाटक सीमाभागातील गोकुळ शिरगाव, कागल पंचतारांकित व पुलाची शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये हजारो कामगार काम करीत आहेत. त्यांची नोकरी धोक्यात आल्याने त्यांना कामासाठी परवानगी देण्यात आली आहे. गेल्या आठवड्यापासून अनलॉक झाल्याने कर्नाटक-महाराष्ट्र सीमा खुला झाल्या असल्या तरी कोल्हापूर जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगा लागत आहेत.
—–
’जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या आदेशानुसार गेल्या अडीच महिन्यापासून कोगनोळी तपासणी नाक्यावर चोख बंदोबस्त ठेवला होता. सर्वच खात्याचे अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस कार्यरत असल्याने कर्नाटकात होणारा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. आता कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्ण संख्या वाढत असल्याने पुन्हा सीमा नाक्यावर तपासणी मोहीम सुरू केली आहे.’
– संगमेश शिवयोगी, मंडल पोलीस निरीक्षक, निपाणी.
Check Also
जीवन विवेक प्रतिष्ठानतर्फे गांधी आगमन आनंद सोहळ्याचे आयोजन
Spread the love बेळगाव : जीवन विवेक प्रतिष्ठान व गांधी विचारप्रेमी यांच्या वतीने महात्मा गांधी …