घरातच नमाजपठण : गर्दी टाळण्याचे आवाहन
निपाणी : मुस्लिम बांधवांकडून बुधवारी (ता.21) बकरी ईद साजरी केली जाणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने बकरी ईदसंदर्भातील अधिसूचना घोषित केल्या आहेत. त्यानुसार सलग दुसर्या वर्षी साध्या पद्धतीने ईद साजरी होणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव काहीअंशी कमी झाल्याचे भासत असले तरी अजूनही संकट टळलेले नाही. तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व प्रकारचे सण – उत्सव कार्यक्रम साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या सूचना केल्या आहेत. 21 जुलैला मुस्लिम बांधवांकडून बकरी ईद साजरी होणार आहे. बकरी ईद निमित्ताने ईदगाह मैदानावर हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव सामुदायिक नमाजपठण करतात. या वर्षी मुस्लिम बांधवांनी ईद साध्या पद्धतीने साजरी करत घरातच नमाजपठण करावयाचे आहे. यासंदर्भातील परिपत्रकामुळे सलग दुसर्या वर्षी मुस्लिम बांधवांना साध्या पद्धतीने ईद साजरी करावी लागणार आहे. ईदची नमाज पठणासह अन्य धार्मिक विधी घरातच करावी लागणार आहे. शहरासह निपाणी तालुक्यात गेल्या महिनाभरापासून कोरोना प्रादुर्भाव बहुतांशी प्रमाणात कमी झाला आहे. रुग्णसंख्यादेखील घटते आहे. गेल्यावर्षी ईद साजरी करता आली नाही. परंतु यंदा उत्साहात साजरी करण्यास प्रशासनाकडून परवानगी मिळण्याची आशा होती. प्रशासनाने प्रसारित केलेल्या परिपत्रकामुळे बांधवांच्या आशेवर पाणी फिरले गेले आहे. असे जरी असले तरी प्रशासनास सहकार्य करण्याच्या प्रतिक्रिया मुस्लिम बांधवांकडून देण्यात आल्या.
