निपाणी : मागच्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर निपाणी तालुक्याच्या सौंदलगा हद्दीत वेदगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. दरम्यान गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास सुमारे १२ फूट पाणी आल्याने गेल्या ३६ तासापासून आंतरराज्य वाहतूक बंद झाली आहे. दरम्यान शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास पाणी पातळीत ३ फुटाने घट झाली असून सध्या निपाणी महामार्गावरून ८ ते १० फूट पाणी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत आहे.
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग
दरम्यान शुक्रवारी रात्रीपासून काही प्रमाणात पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील काही काळ पाऊस थांबल्यास महामार्गावरील वाहतूक सुरू होईल अशी शक्यता आहे.
या सर्व परिस्थितीवर जिल्हा व तालुका प्रशासन लक्ष ठेवून आहे.
महामार्गावर पाणी असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा उभ्या आहेत. २०१९ सालची पुन्हा पुनरावृत्ती झाली आहे.
राष्ट्रीय महामार्ग गेल्या पाच वर्षात तिसऱ्यांदा बंद झाला आहे. २०१९ साली सलग चार दिवस महामार्गावरील वाहतूक बंद होती.
निपाणी तालुक्यात शनिवारी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र वेदगंगा नदीच्या महापुरामुळे हजारो एकरावरील खरिपातील पिके पुराच्या पाण्याखाली गेली आहेत.
निपाणी परिसरात पावसाचा जोर कमी आहे. यामध्ये महामार्गावरील पाणी पातळीत ३ फुटाने घट झाली आहे. मात्र सखल भागामुळे अद्यापही १० फूट पाणी महामार्गावरून वाहत आहे. त्यामुळे शनिवारी दिवसभर पावसाचा जोर कमी राहिल्यास उद्या रविवारी महामार्गावरील पाणी ओसरल्यास आंतरराज्य वाहतूक सुरू होईल, अशी माहिती तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी दिली.
*पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग : नवा पूलही पाण्याखाली जाण्याची शक्यता?*
दरम्यान पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर 2004 साली महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या वेळी वेदगंगा नदीवरील यमगर्णी व सौंदलगा गावच्या सीमेवर नव्याने पूल बांधण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे या पूर्वी कार्यरत असलेला जुना ब्रिटिशकालीन पूल पाण्याखाली गेला आहे. महापुरामुळे नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाला पुराचे पाणी येऊन धडकले आहे. सध्या पावसाचा जोर कमी आहे मात्र पावसाचा जोर वाढला तर सहाजिकच नवा पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.