बेळगाव (वार्ता) : सीमाप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा आणि सीमावासीयांना न्याय मिळवून द्यावा यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे ऑगस्ट क्रांती दिनी पत्र पाठवून लक्ष वेधण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या मोहीमेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर मंत्र्यांनी सहभागी व्हावे यासाठी युवा समितीतर्फे मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्र राज्यातील खासदार आणि आमदारांना पत्र पाठविण्यात आले होते. त्यानंतर अनेकांनी या मोहिमेत सहभागी होत पंतप्रधानांचे लक्ष वेधून घेतले जाईल असे उत्तर कळविले आहे. त्यामुळे युवा समितीच्या उपक्रमात महाराष्ट्रातील नेतेमंडळीही सहभागी होत असल्याने सीमावासीयांनी जास्तीत जास्त संख्येने पत्र पाठवून आपली जबाबदारी पार पाडणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या माय मराठीच्या राज्यात जाण्यासाठी लढणाऱ्या सीमावासीयांना न्याय मिळावा यासाठी अनेक वर्षांपासून लोकशाहीच्या माध्यमातून शांततेने लढा सुरू आहे. तसेच हा प्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना देखील कर्नाटकी सरकारकडून मराठी भाषिकांना विविध प्रकारचा त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भागातील 40 लाख जनतेच्या मागणीकडे लक्ष द्यावे आणि ज्या प्रमाणे आसाम व मिझोरम येथील सीमावाद संपवण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे त्याचप्रमाणे बेळगाव आणि सीमावासीयांचा अस्मितेचा प्रश्न असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाकडे केंद्र सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांसह इतर लोकांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आले आहे.
खानापूर तालुका युवा समिती अध्यक्ष धनंजय पाटील, सचिव सदानंद पाटील, कार्याध्यक्ष किरण पाटील, उपाध्यक्ष पिंटू नवलकर आदींनी निवेदन पाठवले आहे.