आरटी-पीसीआरला विरोध : पोलिस-आंदोलकांत किरकोळ झटापट
कोगनोळी (वार्ता) : ‘कर्नाटक सरकारचं करायचं काय, वर डोके खाली पाय‘ अशा जोरदार घोषणा देत कोगनोळी येथे राष्ट्रीय महामार्गावर असणार्या दूधगंगा नदीजवळ शिवसेनेच्यावतीने गुरूवारी (ता. 5) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कोगनोळी येथील कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर आरटी-पीसीआरची सक्ती केल्याने महाराष्ट्र- कर्नाटक सीमाभागातील नागरिकांवर अन्याय होत आहे. त्या विरोधात शिवसेनेकडून ही धडक मारण्यात आली. सकाळी दहा वाजता कागल येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीने शिवसैनिक दूध गंगानदीजवळ आले. या ठिकाणी असणार्या सीमा तपासणी नाक्यावर आल्यानंतर त्यांनी रास्ता रोको केला. यावेळी पोलिस-आंदोलकांत किरकोळ झटापट झाली. त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन आपल्या वाहनातून नेले. त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.
यावेळी कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख विजय देवणे म्हणाले, ‘कर्नाटक शासनाने दूधगंगा नदीवर चुकीच्या पद्धतीने हा सीमा तपासणी नाका सुरू केला आहे. कर्नाटका लगत असणार्या महाराष्ट्रातील गडहिंग्लज, उत्तूर, चंदगड, आजरा, वंदूर, करनूर, सुळकुड गावाला जाणार्या प्रवाशांना याठिकाणी अडविण्यात येत आहे. त्यामुळे या लोकांची गैरसोय होत आहे. त्यासाठी कर्नाटक शासनाने सीमा तपासणी नाका हा तवंदी येथे सुरू करावा. महाराष्ट्रात जाणार्या लोकांना सोडण्याची व्यवस्था करावी.‘
यावेळी चिक्कोडीचे पोलिस उपाधीक्षक मनोजकुमार नाईक यांना या रास्ता रोकोची माहिती देण्याती आली. सीमावर्ती महाराष्ट्रातील लोकांना जोपर्यंत सोडले जात नाही, तोपर्यंत रस्ता सुरू केला जाणार नाही, असे सांगण्यात आले.
पोलिस उपाधीक्षक मनोजकुमार नाईक म्हणाले, ‘रास्तारोको व मागणीबाबतची माहिती वरिष्ठ अधिकार्यांना देणार आहोत. त्यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहोत.‘
यावेळी आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी कर्नाटकातून महाराष्ट्रात जाणार्या वाहनांना अडविण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिस व शिवसैनिक यांच्यात किरकोळ झटापट झाली. तणाव न वाढण्यासाठी शिवसैनिकांना महाराष्ट्र पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच महामार्ग सुरू करून दळणवळण सुरळीत केले.
मोर्चात शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, संभाजी भोकरे, अशोक पाटील, मंजीत माने, संदीप पाटील, प्रतीक क्षीरसागर, विद्या गिरी, दीपाली घोरपडे, पवन पाटील, वैभव आडके, बाबासाहेब शेवाळे, दिनकर लगारे, राहुल टिकले यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.
निपाणीचे मंडल पोलिस निरीक्षक संगमेश शिवयोगी, निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल कुंभार, एएसआय एस. आय. टोलगी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाटक पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.
महाराष्ट्र पोलिसांच्यावतीने डीवायएसपी आर. आर. पाटील, पीएसआय दत्तात्रय नाळे, पीआय शशिकांत पाटोळे, एपीआय दीपक वाघचौरे, पीएसआय प्रभाकर पुजारी, एपीआय कविता नाईक यांच्यासह पोलिस तैनात करण्यात आले होते.
—————
शिवसेनेच्या धडकेची सर्वत्र चर्चा
कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावर आरटी-पीसीआर रिपार्टची सक्ती केल्याने सीमाभागातील नागरिकांची गोची झाली आहे. हा अन्याय मोडून काढण्यासाठी शिवसेनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार शिवसैनिकांनी गुरूवारी सकाळीच कोगनोळी सीमा तपासणी नाक्याला धडक दिली. त्याची चर्चा संपूर्ण सीमाभागात दिवसभर सुरू होती.
—————-