शशिकला जोल्ले यांना धर्मादायसह हज व वक्फ खाते
बेंगळुरू : कर्नाटकात मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेर झाले आहे. मुख्यमंत्री बोम्मई यांनी महत्वाची खाती स्वत:कडेच ठेवली आहेत. मुख्यमंत्री बोम्मई यांनी अर्थ, बंगळूर विकास आणि मंत्रिमंडळ कामकाज यासह महत्वाची खाती स्वत:कडेच ठेवली आहेत. पहिल्यांदाच मंत्री बनलेल्या अरगा ज्ञानेंद्र यांच्याकडे गृह खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बोम्मई यांनी आज मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर केले. मुख्यमंत्री बोम्मई यांच्यासह 30 मंत्र्यांचे खाते वाटप शनिवारी जाहीर करण्यात आले.
येडीयुराप्पा यांच्या मंत्रीमंडळात बेळगाव जिल्ह्यातील 5 जणांचा समावेश होता. आता दोघांनाच संधी देण्यात आलीयं. हुक्केरीच्या (बेळगाव) उमेश कत्ती यांनी वन व अन्न आणि नागरी पुरवठा खाते सोपवण्यात आले आहे. निपाणीच्या (बेळगाव) शशीकला जोल्ले यांचे खाते बदलण्यात आले आहे. येडीयुराप्पा मुख्यमंत्री असताना जोल्ले यांच्याकडे महिला व बालकल्याण खाते होते. आता त्यांना धर्मादायसह हज व वक्फ खाते देण्यात आले आहे. कागवाडचे (बेळगाव) आमदार श्रीमंत पाटील यांना मंत्रीपद मिळालेले नाही. त्यांच्याकडील वस्त्रोद्योग खात्याची जबाबदारी शंकर बी पाटील मुंचनकोप्प यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. लक्ष्मण सवदी (अथणी, बेळगाव) यांनाही यावेळी मंत्रीपदाने हुलकावणी दिली. त्यामुळे त्यांच्याकडून परीवहन खात्याची जबाबदारी बी. श्रीरामलू यांच्याकडे देण्यात आले आहे.
येडीयुराप्पा यांच्या कार्यकाळात उपमुख्यमंत्री असलेल्या व आता बेळगावचे पालकमंत्री म्हणून निवड झालेल्या गोविंद मक्तप्पा करजोळ यांच्याकडे मोठे व मध्यम सिंचन खाते देण्यात आले आहे. येडियुरप्पांच्या मंत्रिमंडळात आधी असलेले ज्येष्ठ नेते के. एस. ईश्वरप्पा यांच्याकडे ग्रामविकास व पंचायत राज विकास खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. आर. अशोक यांच्याकडे महसूल, बी.श्रीरामुलू यांच्याकडे परिवहन व अनुसूचित जमाती कल्याण खाती सोपवण्यात आली आहेत. लिंगायत नेते व्ही. सोमण्णा यांच्याकडे गृहनिर्माण, पायाभूत विकास तर प्रभू चव्हाण यांच्याकडे पशुसंवर्धन खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. आनंद सिंह यांच्याकडे पर्यावरण विभाग देण्यात आला.
पहिल्यांदाच मंत्रिपद मिळालेले अरगा ज्ञानेंद्र आता गृह खाते सांभाळतील. मुरुगेश निरानी यांनी मोठे व मध्य उद्योग देण्यात आलयं. डॉ. के.सुधाकर यांच्याकडे आरोग्य खाते आणि डॉ. अश्वत नारायण यांच्याकडील उच्च शिक्षण खाते कायम ठेवण्यात आले आहे.