महाराष्ट्र एकीकरण समितीचे आवाहन
बेळगाव : बेळगाव महानगर पालिकेची निवडणूक जाहीर झाली असून निवडणुकीसाठी मराठी भाषिक उमेदवारांनीही मोठ्या संख्येने अर्ज भरले आहेत. एका वॉर्डात अनेक मराठी भाषिक उमेदवार असल्याने मराठी मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे. बेळगाव शहर सीमाभागाचा केंद्रबिंदू असल्याने येथील मराठी जनतेचा आवाज दडपून टाकण्याचा डाव कर्नाटक सरकार व प्रशासन यांनी टाकलेला आहे. त्यादृष्टीने त्यांनी वॉर्डाची रचना बदलून तोडफोड करून व वेगवेगळी आरक्षणे काढून कार्यभाग साधण्याचे प्रयत्न केले आहेत. अशाप्रसंगी मराठी उमेदवार, कार्यकर्ते, मतदार यांनी अत्यंत जबाबदारीने पुढील वाटचाल करणे आवश्यक आहे. मराठी उमेदवारात एकमत करून मराठी उमेदवार निवडून आणण्यासाठी अनेक ठिकाणी पंच मंडळी, प्रमुख नागरिक, कार्यकर्ते प्रयत्न करीत असून उमेदवार व त्यांचे समर्थक यांनीही त्यांना सहाय्य करणे आवश्यक आहे. आपली एकी व निष्ठा दाखविण्याच्या यावेळी पंच मंडळ व प्रमुख नागरिकांनी मराठी भाषेत उमेदवार निवडून आणावेत, असे आवाहन सर्व जनतेस करीत आहे. सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आणि भावी लढ्याच्या दृष्टीने या निवडणुकीचे यश अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, राजाभाऊ पाटील आदींनी केले आहे.