बेळगाव : कोरोना संकटाच्या काळातही नागरिकांना अव्वाच्या सव्वा वीजबिले आकारल्याच्या मुद्द्यावर खानापूरच्या आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी गुरुवारी विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठवला. वाढीव वीजबिलांच्या शॉकने शेतकरी, सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत. याकडे त्यांनी लक्ष वेधले. विधिमंडळ अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी, गुरुवारी प्रश्नोत्तराच्या तासात चर्चेवेळी खानापूरच्या आ. अंजली निंबाळकर यांनी वाढीव वीजबिलांच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले. सध्या वनरूम किचनच्या घरांना पाचशे, हजार रु. वीज बिल आकारण्यात येत आहे.
कोरोना संकटातही जुलै, ऑगस्ट महिन्यात 18 ते 45 हजारापर्यंतची बिले आमच्या शेतकर्यांनी भरली आहेत. याबाबत हेस्कॉम अधिकार्यांकडे तक्रार करूनही काहीही उपयोग झालेला नाही. माझ्या स्वतःच्या घरचे 9 हजार रु. वीज बिल मी भरले आहे. वाढीव वीजबिलांचा आम्हाला एवढा त्रास होत असेल तर आमच्या गरीब शेतकर्यांना का होऊ नये? कोरोना संकटात शेतकरी, कष्टकर्यांचे जगणे कठीण झाले आहे असे आ. निंबाळकर म्हणाल्या.
यावर उत्तर देताना ऊर्जामंत्री सुनीलकुमार म्हणाले, वाढीव वीजबिलांची अशी प्रकरणे आमच्या नजरेस आ. निंबाळकर यांनी आणून दिल्यास ती ठीक करून देण्यात येतील असे आश्वासन दिले. तत्पूर्वी विजापूर जिल्ह्यातील इंडीचे आ. यशवंतरायगौडा पाटील यांनीही वीज विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले. या विभागात आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही. देशातील अनेक राज्ये आज वीज उत्पादनात स्वावलंबी झाली आहेत. राज्यातही 6 लाख मेगावॅट वीज उत्पादन होत आहे. अशावेळी अन्य राज्यातील उद्योगांना 2 रु. 30 पैसे युनिट या दराने वीज पुरवण्यात येते. मात्र तीच वीज राज्यातील उद्योगांना 8 ते 9 रु. या दराने विकण्यात येते असा आरोप करून आ. पाटील यांनी हा कुठला न्याय आहे असा सवाल केला. त्यावर उत्तर देताना ऊर्जामंत्री सुनीलकुमार म्हणाले, आमच्या राज्यातील उद्योजकांना त्रास देण्याचा आमच्या सरकारचा हेतू नाही. उद्योजकांच्या विजेशी संबंधित समस्या सोडविण्याबाबत 15 दिवसांपूर्वीच बैठक घेण्यात आली आहे. पूढील आठवड्यात उद्योजकांची आणखी एक व्यापक बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे. त्यांच्या समस्या ऐकून त्यावर साधक-बाधक चर्चा करून अन्य राज्यांप्रमाणे काही तोडगा काढता येतो का?, वीज दर सुधारणा आदी विषयांवर या बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे असे ऊर्जामंत्र्यांनी सांगितले.
एकंदर वाढीव वीजबिलांचा मुद्दा, वीज विक्रीत राज्यातील उद्योजकांबाबत भेदभाव आदी मुद्द्यांवर सरकारचे लक्ष वेधण्यात काँग्रेस आ. अंजली निंबाळकर आणि आ. यशवंतरायगौडा पाटील यशस्वी झाले.
Check Also
कर्नाटक कोचिंग सेंटरमधून 50 हून अधिक विद्यार्थ्यांची एसएससी जीडी 2024 परीक्षेमध्ये निवड
Spread the love बेळगाव : विनय ल्हासे सर आणि श्रीशैल तल्लुर सरांच्या मार्गदर्शनाखाली एकाच कोचिंग …