वॉर्ड क्र. 31 मधील उमेदवारांची मागणी
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 31 मध्ये लोकशाहीच्या मुल्यांना हरताळ फासून मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला असून त्याची नि:पक्ष चौकशी करून पुन्हा पारदर्शक पद्धतीने निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी वॉर्ड क्र. 31 च्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवार राजश्री हावळ, काँग्रेस उमेदवार वनिता गोंधळी आणि आपच्या उमेदवार राखी हेगडे यांनी जिल्हाधिकार्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यश्री हावळ, वनिता गोंधळी व राखी हेगडे मनपा निवडणूक रिंगणातील उमेदवारांनी उपरोक्त मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकार्यांना सादर केले. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
बेळगाव महानगर पालिका निवडणूकमध्ये वॉर्ड क्र. 31 मध्ये लोकशाहीच्या सर्व मुल्याना हरताळ फासला आहे. निवडणुका या लोकांच्या इच्छा प्रकट करण्याचे माध्यम आहे. तथापी वॉर्ड क्रमांक 31 मधील मतदार यादीत बाहेरील लोकांचा मोठ्या प्रमाणात भरणा केला असून त्याचा निवडणुकीच्या निकालावर परिणाम झाला आहे.
येथील मतदारयादीत मोठ्या प्रमाणात महानगर पालिका हद्दीबाहेरील लोकांची नांवे नोंदविली गेली आहेत. हे करताना अनेक स्थानिक लोकांची नांवे गहाळ करण्यात आली आहेत. कित्येक लोकांची नांवे इतर वार्डमध्ये घातली असून तब्बल 1000 नावे ही दुसर्या प्रभागातील लोकांची आहेत. मतदार यादीमध्ये मृत व्यक्तींची नांवे देखील मोठ्या प्रमाणात असून एकंदररित्या या सर्व गैरप्रकारांचा निवडणूक निकालावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींची नि:पक्ष चौकशी करून पुन्हा पारदर्शक पद्धतीने निवडणुका घेण्यात याव्यात. सदर निवडणुकामध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला नसल्याने अनेक मतदार संभ्रमात आहेत.
कोणाला मतदान झाले याबाबत ते संशयाच्या वातावरणात आहेत. त्यामुळे सर्व गोष्टींची चौकशी करण्यात यावी अशा आशयाचा तपशील वॉर्ड क्र. 31 च्या म. ए. समितीच्या उमेदवार राजश्री हावळ, काँग्रेस उमेदवार वनिता गोंधळी तसेच आपच्या उमेदवार राखी हेगडे यांनी जिल्हाधिकार्यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे.
Check Also
साठे प्रबोधिनीतर्फे काव्य सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन
Spread the love बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य वि. गो. साठे …