बेळगाव : बेळगावच्या सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग स्कूल येथे भारतीय सशस्त्र दलांनी 1971 सालच्या युद्धात पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयाचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्यात आला.
एअरमन ट्रेनिंग स्कूलच्या सभागृहात एअरमन ट्रेनिंग स्कूल बेळगावचे एअर ऑफिसर कमांडिंग एअर कमोडोर एस. डी. मुकुल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त एअर व्हाईस मार्शल मोहन दिक्षित उपस्थित होते.
यावेळी 1971च्या युद्धातील विजयाचे प्रतीक असलेल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 16 डिसेंबर 2020 रोजी नवी दिल्लीत राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ठिकाणी प्रज्वलित केलेल्या ‘विजय ज्योती’चे एअर कमोडोर एस. डी. मुकुल यांनी स्वागत केले.
सुवर्णमहोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांसह मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या वाद्यवृंदाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच देशभक्तीपर चित्रपटाचे प्रसारणही करण्यात आले. सुवर्ण विजय वर्षानिमित्त याप्रसंगी सेवानिवृत्त एअर व्हाईस मार्शल दीक्षित यांचा सत्कार करण्यात आला. या ज्येष्ठ एअर व्हाईस मार्शलना 1971 सालच्या युद्धातील शौर्याबद्दल वीर चक्राने सन्मानित करण्यात आले आहे. पाकिस्तानविरुद्धच्या त्या युद्धात फायटर पायलट म्हणून मोहन दीक्षित यांनी साहसपूर्ण वैमानिक कौशल्य आणि शौर्य गाजवले होते. एअरमन ट्रेनिंग स्कूल येथील सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाची सांगता एअर कमोडोर एस. डी. मुकुल यांच्या अध्यक्षीय भाषणाने झाली. याप्रसंगी भारतीय हवाई दलाचे अधिकारी, जवान आणि निमंत्रित उपस्थित होते.
Check Also
१९२४च्या काँग्रेस अधिवेशनामुळे स्वातंत्र्य चळवळीला बळ मिळाले : प्राचार्य आनंद मेणसे
Spread the love बेळगाव अधिवेशनाला १०० वर्षे पूर्ण निमित्त अंनिसतर्फे विशेष व्याख्यान बेळगाव : हिंदू …