बेळगाव : पंतप्रधानांनी गेल्या 16 डिसेंबर 2020 रोजी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ठिकाणी अमर जवान ज्योतीने प्रज्वलित केलेल्या 1971 मध्ये पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयाचे प्रतीक असलेल्या ‘विजय ज्योती’चे बेळगावची शान असलेल्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (एमएलआयआरसी) येथे हर्षोल्हासात लष्करी इतमामात स्वागत करण्यात आले.
एमएलआयआरसी येथे विजय ज्योतीचे आगमन होताच तिची शानदार मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीतील 50 मोटरसायकलस्वारांचा ताफा सार्यांचे लक्ष वेधून घेत होता. रेजिमेंटच्या पाईप बँडद्वारे ज्योतीचे स्वागत करण्यात आले त्याचप्रमाणे कॉर्टर गार्ड येथे सुसज्ज जवानांनी विजय ज्योतीला ‘गार्ड ऑफ ऑनर’द्वारे मानवंदना दिली.
भारताने 1971 च्या लढाईत पाकिस्तानवर विजय मिळवला होता. या विजयाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त तसेच भारतीय जवानांच्या निस्वार्थ बलिदान आणि समर्पणाच्या स्मृत्यर्थ विजय ज्योतीचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगावप्रमाणे अथणी, सांबरा आणि धारवाड येथे देखील विजय ज्योतीचे सन्मानपूर्वक स्वागत करून 1971च्या लढाईतील वीर जवानांना मानवंदना देण्यात आली.
विजय ज्योतीच्या आगमनानिमित्त बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे आज बुधवारी सकाळी भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मराठा सेंटरच्या पाइप बँड या खास वाद्यवृंदाने ज्योतीला उचित लष्करी मानवंदना दिली. त्यानंतर बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, एमएलआयआरसीचे कमांडंट ब्रिगेडियर रोहित चौधरी, सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल दिलीप देसाई आणि सुभेदार मेजर सलीम एस. यांनी विजय ज्योतीला पुष्पहार अर्पण केला.
स्वागत समारंभानिमित्त एमएलआयआरसीच्या जवानांनी लेझीम, झांज आणि मल्लखांब यांची शानदार प्रात्यक्षिके सादर केली. मल्लखांबाच्या रोमहर्षक प्रात्यक्षिकांनी तर उपस्थितांची मनेच जिंकली. समारंभास लष्करी अधिकारी, जवान, निमंत्रित आणि 22 कर्नाटक एनसीसी बटालियनचे छात्र उपस्थित होते.
