बेळगाव : सार्वजनिक वाचनालय, बेळगाव या संस्थेच्यावतीने सालाबादप्रमाणे यंदाही राजर्षी शाहू छत्रपती महाराज जयंतीचे औचित्य साधून दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.
सन 2025-26 या शैक्षणिक वर्षामध्ये मराठी माध्यम दहावी (एस.एस.एल.सी.) परीक्षेत बेळगाव शहर आणि बेळगाव तालुका या विभागात सर्वप्रथम आलेल्या एका विद्यार्थी/विद्यार्थिनीस प्रत्येकी रुपये 5,000/- रोख व प्रशस्तीपत्र तसेच सदर विभागातील प्रत्येक शाळेत सर्वप्रथम क्रमांक घेऊन उत्तीर्ण झालेल्या एका विद्यार्थी/विद्यार्थिनीस प्रत्येकी रुपये 1,000/- रोख व प्रशस्तीपत्र याप्रमाणे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
त्या अनुषंगाने सदर विभागांतील मुख्याध्यापकांना सूचित करण्यात येते की, आपल्या शाळेतील पात्र विद्यार्थी/विद्यार्थिनीची माहिती (विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक, मिळालेले गुण) शाळेच्या लेटरहेडवर सही-शिक्क्यानिशी मंगळवार दि. 30 जून 2026 पर्यंत वाचनालयाच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत पोहोचेल अशा पध्दतीने पोस्टाने पाठविण्याची किंवा समक्ष आणून देण्याची व्यवस्था करावी. सदर कार्यक्रमाची वेळ, दिनांक व स्थळ विद्यार्थ्यांना परस्पर कळविण्यात येईल. तरी सदर विभागातील मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील पात्र विद्यार्थी-विद्यार्थिनीचे नाव वेळेत पाठवून संस्थेस सहकार्य करावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष नेताजी जाधव व कार्यवाह सौ. लता पाटील यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta