



फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा गंडा
बेळगाव : नवनवीन युक्त्या वापरून सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार सायबर गुन्हेगारांकडून सुरूच आहेत. आता निवृत्त कर्मचारी व अधिकाऱ्यांना आवश्यक असलेल्या जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली एका वृद्धाला लक्ष्य करण्यात आले आहे. फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद दिल्यानंतर व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर गुन्हेगारांनी गोकाक येथील ६० वर्षीय वृद्धाच्या बँक खात्यातून तब्बल २ लाख ३७ हजार रुपये लंपास केले आहेत. याप्रकरणी बुधवारी जिल्हा सायबर क्राईम विभागात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
देवेंद्र असे फसवणूक झालेल्या निवृत्त कर्मचाऱ्याचे नाव आहे. निवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना दरवर्षी हयातीचा दाखला अर्थात जीवित प्रमाणपत्र सादर करावे लागते. देवेंद्र यांनाही या प्रमाणपत्राची आवश्यकता होती. त्यामुळे जीवित प्रमाणपत्र कसे मिळवावे, यासंबंधीची जाहिरात त्यांनी फेसबुकवर पाहिली. जाहिरातीतील लिंकवर क्लिक करून त्यांनी स्वतःची माहिती भरण्यास सुरुवात केली. मात्र, काही कारणास्तव फॉर्म पूर्ण भरता न आल्याने त्यांनी तो अर्धवटच सोडून दिला.
दरम्यान, काही वेळानंतर देवेंद्र यांना व्हॉट्सॲपवर कॉल आला. तुम्ही जीवित प्रमाणपत्रासाठीचा अर्ज अर्धवट भरला असून तो पूर्ण करून द्या, असे सांगण्यात आले. त्यानंतर ‘कॅनरा लाइफ सर्टिफिकेट’ नावाची एपीके फाईल त्यांना पाठविण्यात आली. आपण स्वतःहून प्रमाणपत्रासाठी संपर्क साधला असल्याने समोरून आलेली व्यक्ती अधिकृतच असावी, असा समज करून देवेंद्र यांनी संबंधित एपीके फाईल डाउनलोड केली.
त्यानंतर २८ ऑक्टोबर रोजी त्यांच्या बँक खात्यातून दोन टप्प्यांत रक्कम अन्य खात्यांमध्ये वळविण्यात आली. पहिल्यांदा १ लाख ५३ हजार रुपये, तर दुसऱ्यांदा ८४ हजार रुपये अशा एकूण २ लाख ३७ हजार रुपयांची रक्कम लंपास करण्यात आली. बँक खात्यातून पैसे काढले गेल्याचे लक्षात येताच आपली फसवणूक झाल्याचे देवेंद्र यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सायबर क्राईम विभागाकडे धाव घेत तक्रार दाखल केली.
अनोळखी लिंक आणि एपीके फाईलपासून सावध राहा! जीवित प्रमाणपत्र, पेन्शन किंवा शासकीय योजनांच्या नावाखाली येणाऱ्या अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. तसेच व्हॉट्सॲपवर पाठविण्यात येणाऱ्या एपीके फाईल डाउनलोड करू नयेत, असे आवाहन सायबर सुरक्षा यंत्रणांकडून केले जाते.
Belgaum Varta Belgaum Varta