Friday , November 6 2026
Breaking News
CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 75?

बंगळुरूमध्ये थरारक हत्याकांड; पत्नींसह सात नातेवाइकांची वरवंट्याने ठेचून हत्या!

Spread the love

 

 

कौटुंबिक वादातून ४५ वर्षीय कॅब चालकाचे क्रूर कृत्य; पार्टीच्या बहाण्याने एकेकाला घरी बोलावले, सात वर्षांच्या बालकाचाही समावेश

बंगळुरू : कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये कौटुंबिक वादातून घडलेल्या भीषण हत्याकांडाने संपूर्ण राज्य हादरले आहे. पत्नीशी सुरू असलेल्या वादातून ४५ वर्षीय कॅब चालकाने स्वतःच्या पत्नीसह तिच्या कुटुंबातील सात जणांची वरवंट्याने डोक्यात वार करून निर्घृण हत्या केली. राजाजीनगर येथील राहत्या घरी दोन दिवसांत एकेकाला बोलावून आरोपीने हे हत्याकांड घडवून आणल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी शेखर ऊर्फ इंदुशेखर (वय ४५) याला अटक केली आहे.

मृतांमध्ये सात वर्षांच्या बालकाचाही समावेश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये आरोपीची पत्नी सुनीता, सासू रूपावती, मेहुणे शिवकुमार व शंकर, नातेवाईक दिव्या व नलिनी तसेच शिवकुमार यांचा सात वर्षांचा मुलगा पुनीत यांचा समावेश आहे. पुनीतचा मृतदेह चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यातील नंदी हिल्स परिसरात आढळून आला असून, अन्य मृतदेहांचा शोध पोलीस घेत आहेत.

पार्टीच्या बहाण्याने रचला हत्येचा कट

शेखर आणि सुनीता यांचा विवाह सुमारे २० वर्षांपूर्वी झाला होता. मात्र, गेल्या काही काळापासून दोघांमध्ये सतत कौटुंबिक वाद होत होते. या वादात सुनीताच्या माहेरची मंडळी हस्तक्षेप करून तिची बाजू घेत असल्याचा राग आरोपीच्या मनात होता. याच रागातून त्याने संपूर्ण कुटुंबाला संपविण्याचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे.

आरोपीने प्रथम पत्नी सुनीताची हत्या केली. त्यानंतर इतर नातेवाइकांना वेगवेगळी कारणे सांगून घरी बोलावले. मेहुण्यांना तर पार्टीच्या बहाण्याने आमंत्रित केले होते. घरी आलेल्या प्रत्येकाची वरवंट्याने डोक्यात वार करून हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी ते चिक्कबळ्ळापूर परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी टाकल्याचे समोर आले आहे.

बेपत्ता तक्रारीमुळे हत्याकांडाचा उलगडा

नलिनी बेपत्ता झाल्याने तिच्या आईने श्रीरामपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या तपासादरम्यान पोलिसांना शेखरच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता सात जणांच्या हत्याकांडाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

राजाजीनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, उर्वरित मृतदेहांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे बंगळुरूमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

दिवाळीत रात्री ८ ते १० याच वेळेत फटाके फोडण्यास परवानगी!

Spread the love  राज्यात केवळ हिरव्या फटाक्यांची विक्री व वापर; रुग्णालये, शाळांच्या परिसरात फटाके फोडण्यास …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *