Friday , November 6 2026
Breaking News

ऊसदराच्या तोडग्यानंतर शेतकरी आंदोलनाला तात्पुरता ब्रेक!

Spread the love

 

प्रतिटन ३,६०० रुपये दर मान्य; उद्यापासून कारखाने सुरू होणार; १,००० रुपयांच्या अनुदानासाठी पुन्हा संघर्षाचा इशारा

बेळगाव : ऊस दराच्या प्रश्नावर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला अखेर तात्पुरता तोडगा निघाला आहे. साखर कारखानदारांनी प्रतिटन ३,६०० रुपये दर देण्याची तयारी दर्शविल्यानंतर शेतकरी नेते चुणप्पा पुजारी यांनी आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली. त्यामुळे उद्यापासून साखर कारखाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पोलीस कोठडीतून सुटका झाल्यानंतर पोलीस क्वार्टर्समधील वीरभद्र मंदिरात बोलताना पुजारी यांनी शेतकऱ्यांना कारखाने सुरू करण्यास अडथळा आणू नये, असे आवाहन केले.

शेतकऱ्यांनी प्रतिटन ३,८०० रुपयांची मागणी केली होती. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या मध्यस्थीने कारखानदारांनी ३,६०० रुपये दर देण्यास सहमती दर्शविली. तसेच साखरेच्या विक्रीदरात प्रत्येक ५० रुपयांनी वाढ झाल्यास त्याचा लाभ शेतकऱ्यांनाही देण्याचे मान्य करण्यात आले आहे. साखर विक्रीतील लाभांशात शेतकऱ्यांना वाटा देण्याचा हा महत्त्वपूर्ण निर्णय असल्याचे पुजारी यांनी नमूद केले.

मात्र, राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेले प्रतिटन १,००० रुपयांचे प्रोत्साहन अनुदान अद्याप मिळालेले नाही. बेळगावच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्र्यांनी याबाबत घोषणा करावी. अन्यथा अधिवेशनादरम्यान पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

गुरलापूर येथील आंदोलनही स्थगित करण्यात आले असून, पुढील रणनीती ठरविण्यासाठी उद्या शेतकऱ्यांची बैठक होणार आहे. कारखाने सुरू करण्यास हिरवा कंदील मिळाला असला, तरी प्रोत्साहन अनुदानाचा प्रश्न अद्याप कायम असल्याने शेतकऱ्यांचा पुढील लढा सरकारच्या निर्णयावर अवलंबून राहणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

अनाथाश्रमातील मुलांना नवीन कपड्यांचे वाटप

Spread the love    बेळगाव : दिवाळीच्या मंगलमय सणानिमित्त रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या सदस्यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *