Friday , November 6 2026
Breaking News

साठे प्रबोधिनी आयोजित कथाकथन स्पर्धा व बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न

Spread the love

 

बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई आणि गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे आयोजित करण्यात आलेली कथाकथन स्पर्धा व प्रबोधिनीच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
साठे प्रबोधनीतर्फे वर्षभरामध्ये विद्यार्थ्यांसाठी मराठी व्याकरण स्पर्धा, परीक्षा, हस्ताक्षर स्पर्धा, निबंध स्पर्धा व भाषण स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरविण्यात आले.
तसेच २६ व्या मराठी बालसाहित्य संमेलनाच्या कथाकथन सत्रासाठी विद्यार्थ्यांची कथाकथन स्पर्धा घेण्यात आली व यातून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण व्हावी, त्यांच्यातील वाचनसंस्कृती वाढीस लागावी तसेच कथाकथनाच्या माध्यमातून भाषिक कौशल्य, कल्पनाशक्ती आणि अभिव्यक्ती क्षमता विकसित व्हावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन स्वतंत्र गटांत स्पर्धा घेण्यात आली. दोन्ही गटांमधून एकूण ४० स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील कथा प्रभावी आवाज, योग्य हावभाव, शब्दफेक आणि सादरीकरण कौशल्याच्या माध्यमातून सादर केल्या. त्यांच्या उत्स्फूर्त सादरीकरणामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मालोजी अष्टेकर होते. स्पर्धेचे परीक्षण शैलजा मत्तिकोप, संजीवनी खंडागळे, बी. बी. शिंदे आणि बसवंत शहापूरकर यांनी केले. व्यासपीठावर सविता पवार आणि ज्योती मजुकर उपस्थित होत्या.

यावेळी अध्यक्ष मालोजी अष्टेकर यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले. कथाकथन ही केवळ मनोरंजनाची कला नसून ती भाषेवरील प्रभुत्व, विचारांची मांडणी, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व विकास घडविणारे प्रभावी माध्यम आहे. विद्यार्थ्यांनी मराठी साहित्याचे नियमित वाचन करून आपल्या भाषिक कौशल्यात भर घालावी, असे आवाहनही त्यांनी केले.

परीक्षकांनी स्पर्धकांच्या कथाकथनातील आशय, उच्चार, आवाजातील चढ-उतार, सादरीकरण, हावभाव आणि आत्मविश्वास या विविध बाबींच्या आधारे परीक्षण केले. विद्यार्थ्यांनी दाखविलेला उत्साह आणि मराठी भाषेप्रती असलेली आत्मीयता कौतुकास्पद असल्याचे मत परीक्षकांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद सावंत यांनी प्रभावीपणे केले. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी इंद्रजीत मोरे, धीरज सिंह राजपूत, गजानन सावंत, शांताराम पाटील, स्नेहा कुप्पेकर आणि संध्या चौगुले यांनी विशेष परिश्रम घेतले.
यशस्वी स्पर्धक –
भूमी भातकांडे (बालिका आदर्श), अथर्व गुरव( विद्यामंदिर तडशिनहाळ), मनाली बराटे( मराठी विद्यानिकेतन), समर्थ दोरकाडी (ठळकवाडी हायस्कूल), सृष्टी देसाई( बालिका आदर्श), अनुज बाळेकुंद्री (सरस्वती हायस्कूल हंदिगनूर)

मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्याबरोबरच नव्या पिढीमध्ये मराठी साहित्याची आवड निर्माण करणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि आयोजकांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे कथाकथन स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न झाली.

About Belgaum Varta

Check Also

मराठी फलक हटविणाऱ्यांवर कारवाई करा; अन्यथा रस्त्यावर उतरू!

Spread the love  मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम; मोर्चा काढण्याचा इशारा बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *