



मार्कंडेय नगर सरकारी शाळेत २४६ विद्यार्थ्यांची ॲनिमिया तपासणी; गरजू विद्यार्थ्यांना मोफत औषधांचे वाटप
बेळगाव : विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे संरक्षण आणि त्यांच्यात आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे हॅपी हार्ट फाउंडेशनच्या सहकार्याने मार्कंडेय नगर येथील सरकारी शाळेत ॲनिमिया (रक्तक्षय) तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात एकूण २४६ विद्यार्थ्यांची रक्तक्षय तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ॲनिमियाची लक्षणे आढळलेल्या विद्यार्थ्यांना पुढील उपचारांसाठी मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. याशिवाय केएलई शताब्दी रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने विद्यार्थ्यांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी करून त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांची माहिती घेतली.
मुलांमधील रक्तक्षयासारख्या समस्या वेळीच निदर्शनास आणून त्यावर योग्य उपचार करणे आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून रोटरी क्लबचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि बालकांचे आरोग्य संवर्धन यासाठी क्लबने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे.
या उपक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल हॅपी हार्ट फाउंडेशन आणि केएलई शताब्दी रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाचे क्लबतर्फे आभार मानण्यात आले. तसेच उपक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष योगदान दिल्याबद्दल रोटेरियन रक्षाताई उपाध्ये यांचे कौतुक करण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या अध्यक्षा रोटे. डॉ. स्फूर्ती मस्तीहोळी आणि सचिव रोटे. ज्योती कुलकर्णी यांनी या उपक्रमाची माहिती दिली.
Belgaum Varta Belgaum Varta