



स्क्रीनिंग कमिटी स्थापन; ताईंच्या नेतृत्वाखाली उमेदवार निवडीची प्रक्रिया होणार
खानापूर : आगामी जिल्हा पंचायत (झेडपी) आणि तालुका पंचायत (टीपी) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुक्यात काँग्रेस पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाकडे आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून, अद्याप अर्ज सादर न केलेल्या इच्छुकांनी तातडीने अर्ज भरून पक्षाध्यक्षांकडे जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
ताईंच्या नेतृत्वाखाली निवडणूक स्क्रीनिंग कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. इच्छुकांचे अर्ज या कमिटीसमोर चर्चेसाठी ठेवण्यात येणार असून, त्यानंतर ताई उमेदवार निवडीबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत. त्यामुळे इच्छुक कार्यकर्त्यांनी कोणतीही काळजी न करता पक्षाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे सांगण्यात आले.
तालुक्यातील काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते आपापल्या झेडपी आणि टीपी मतदारसंघांत सक्रिय झाले असून, निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार तयारी करण्याच्या सूचना ताईंनी दिल्या आहेत. काही कार्यकर्ते झेडपी, काही टीपी, तर काही ग्रामपंचायत निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत.
राज्य सरकारची विकासकामे, सर्वसामान्य नागरिक, कामगार, महिला आणि गरीब कुटुंबांसाठी राबविण्यात येणाऱ्या लोकप्रिय गॅरंटी योजना या बाबी जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात येणार आहेत. तसेच विद्यमान आमदारांविषयी जनतेत असलेली नाराजी आणि विरोधी पक्षातील अंतर्गत मतभेद हे मुद्देही प्रचारात मांडले जाणार आहेत.
जनतेसमोर सरकारची कामगिरी मांडून नम्रपणे मतांचा कौल मागितला जाईल. सर्व कार्यकर्त्यांनी आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागावे, अशा स्पष्ट सूचना ताईंनी दिल्या आहेत. काँग्रेसला या निवडणुकीत निश्चित यश मिळेल, असा विश्वासही पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta