



राज्य सरकारकडून ७,४०५.८६ कोटींचा निधी मंजूर; १.२४ कोटी महिलांच्या खात्यात प्रत्येकी सहा हजार रुपये जमा होणार
बेळगाव : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महिला लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत प्रलंबित असलेले तीन महिन्यांचे हप्ते एकाच वेळी वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी यासंदर्भात आदेश दिले असून, यासाठी एकूण ७ हजार ४०५.८६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे पात्र महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी सहा हजार रुपये जमा होणार आहेत.
गृहलक्ष्मी योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर राज्यातील अनेक महिलांच्या घरखर्चाचे नियोजन अवलंबून असते. मात्र, मागील तीन महिन्यांपासून योजनेचे हप्ते जमा झाले नसल्याने लाभार्थी महिलांमध्ये प्रतीक्षा होती. अखेर दिवाळीच्या मुहूर्तावर सरकारने तीनही हप्ते एकाच वेळी वितरित करण्याचा निर्णय घेतल्याने महिलांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
या योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात ३३ हप्त्यांची रक्कम जमा करण्यात आली आहे. आता ३४वा, ३५वा आणि ३६वा हप्ता एकाच वेळी वितरित केला जाणार आहे. यामध्ये ३४व्या हप्त्यासाठी २ हजार ५०० कोटी रुपये, तर ३५व्या आणि ३६व्या हप्त्यासाठी प्रत्येकी २ हजार ४५२.९३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
या तीन हप्त्यांच्या वितरणामुळे प्रत्येक पात्र महिला लाभार्थीच्या खात्यात एकूण सहा हजार रुपये जमा होतील. गृहलक्ष्मी योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत प्रत्येक लाभार्थी महिलेला एकूण ७२ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळालेली असेल.
ऑक्टोबरअखेरच्या आकडेवारीनुसार, राज्यातील सुमारे १.२४ कोटी महिला कुटुंबप्रमुखांच्या बँक खात्यांमध्ये या योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण ८६ हजार ८३८.३६ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.
महागाईच्या काळात घरखर्च भागविण्यासाठी गृहलक्ष्मी योजनेची रक्कम अनेक महिलांसाठी महत्त्वाची ठरत आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून प्रलंबित असलेली रक्कम एकाच वेळी मिळणार असल्याने दिवाळीच्या सणासाठी महिलांच्या हातात सहा हजार रुपयांचा बोनस मिळणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta