



बेळगाव : महागाईचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडत चालले आहे. दिवाळीच्या तोंडावरच दूध दरवाढीचा फटका बसलेला असताना आता बस प्रवासही महागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळासह बंगळूर महानगर परिवहन महामंडळाच्या बस तिकीट दरवाढीच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, दरवाढीबाबतचा अंतिम निर्णय घेण्याची जबाबदारी परिवहन विभागावर सोपविण्यात आली आहे.
महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या शक्ती योजनेअंतर्गत मोफत बस प्रवासाची सुविधा दिल्यामुळे परिवहन विभागावर आर्थिक भार वाढला आहे. परिणामी, महामंडळाला आर्थिक तोटा सहन करावा लागत असून, बस चालविण्यासाठी आवश्यक असलेले डिझेल खरेदी करण्यासाठीही निधीची कमतरता भासत असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर बस प्रवासाच्या भाड्यात वाढ करण्याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून परिवहन विभागाला देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत बस तिकीट दरवाढीबाबत चर्चा झाल्याची माहिती परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी दिली होती. बस प्रवासाचे दर वाढविण्याचा निर्णय सरकारने यापूर्वीच घेतला असून, दरवाढीची अंमलबजावणी कधी आणि किती प्रमाणात करायची, याचा अंतिम निर्णय परिवहन विभाग घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दूध दरवाढीनंतर आता बस प्रवासही महागण्याची शक्यता असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. विशेषतः रोज बसने प्रवास करणारे नोकरदार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील प्रवाशांना या संभाव्य दरवाढीचा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
Belgaum Varta Belgaum Varta