



हर्बल लाईफ कंपनीच्या नावाने बनावट पत्र पाठवून गोकाक तालुक्यातील व्यक्तीला गंडा; सायबर पोलिसांत गुन्हा दाखल
बेळगाव : ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार सातत्याने समोर येत असतानाही नागरिकांची फसवणूक होण्याचे सत्र सुरूच आहे. पोलिसांकडून वारंवार जनजागृती करूनही आमिषांना बळी पडणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. असाच प्रकार गोकाक तालुक्यातील मेळवंकी येथे उघडकीस आला असून, मोटार बक्षीस लागल्याचे सांगून तसेच मोटार नको असल्यास २५ लाख ८० हजार रुपये रोख देण्याचे आमिष दाखवत एका व्यक्तीची १ लाख १५ हजार २०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी जिल्हा सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हर्बल लाईफ कंपनीच्या नावाने पाठविण्यात आलेल्या बक्षिसाच्या पत्राचा वापर करून भामट्यांनी ही फसवणूक केली. तक्रारदार मारुती यांचे गोकाक येथील एका बँकेत खाते आहे. ३१ जुलै २०२६ रोजी त्यांच्या दूरच्या नातेवाईक सावक्का श्रीशैल देवरमणी (रा. मेळवंकी) यांच्या पत्त्यावर ‘हर्बल लाईफ गव्हर्नमेंट’ कंपनीच्या नावाने टपालाद्वारे बक्षीस लागल्याचे पत्र आणि स्क्रॅच कार्ड आले होते. देवरमणी यांनी हे पत्र आणि कार्ड तक्रारदाराकडे दिले.
तक्रारदाराने स्क्रॅच कार्ड खरडले असता प्रथम पारितोषिक म्हणून मोटार लागल्याचे नमूद होते. त्यामुळे पत्रावर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला. त्यावेळी पुढील प्रक्रिया व्हॉट्सॲपद्वारे पूर्ण केली जाईल, असे सांगण्यात आले. मोटार हवी असल्यास कर व इतर शुल्क भरावे लागतील, तर मोटार नको असल्यास २५ लाख ८० हजार रुपये रोख दिले जातील, असे आमिष दाखविण्यात आले.
तक्रारदाराने रोख रक्कम घेण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर संशयितांनी व्हॉट्सॲपवर काही फोन-पे क्रमांक पाठविले. त्यानुसार तक्रारदाराने आपल्या बँक खात्यातून टप्प्याटप्प्याने संबंधित क्रमांकांवर एकूण १ लाख १५ हजार २०० रुपये पाठविले. मात्र, पैसे मिळाल्यानंतर संशयितांनी ना मोटार दिली, ना बक्षिसाची रोख रक्कम. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने सायबर पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार नोंदविली.
अनपेक्षित बक्षीस, लॉटरी किंवा मोठ्या रकमेचे आमिष दाखवून पैसे मागितले जात असल्यास नागरिकांनी सावध राहावे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला ऑनलाइन पैसे पाठवू नयेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta