Friday , November 6 2026
Breaking News

स्कूटरचालकाच्या मदतीला धावलेल्या गावकऱ्यांना भरधाव ट्रकची धडक; चिमुकल्यासह ७ जणांचा मृत्यू!

Spread the love

 

खुंटी (झारखंड) : रस्त्याच्या कडेला खड्ड्यात घसरलेली स्कूटर बाहेर काढण्यासाठी मदतीला धावलेल्या गावकऱ्यांना भरधाव १६ चाकी ट्रकने चिरडल्याची हृदयद्रावक घटना झारखंडमधील खुंटी जिल्ह्यात घडली. गुरुवारी रात्री झालेल्या या भीषण अपघातात ११ महिन्यांच्या चिमुकल्यासह सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास गावातील एका व्यक्तीची स्कूटर रस्त्यालगतच्या खड्ड्यात घसरली होती. ती बाहेर काढण्यासाठी त्याने गावकऱ्यांकडे मदत मागितली. त्यानंतर काही महिला आणि लहान मुलांसह अनेक जण मदतीसाठी रस्त्यावर जमले होते.

याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या १६ चाकी ट्रकने या समूहाला जोरदार धडक दिली. धडकेनंतर ट्रक रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन आदळला. अपघातात ११ महिन्यांचा सौरभ नायक, त्याची आई अंजली कुमारी यांच्यासह सात जणांचा मृत्यू झाला.

या दुर्घटनेत पाच वर्षांची खुशबू कुमारी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर खुंटी सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर ट्रकचालक वाहन सोडून घटनास्थळावरून फरार झाला. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके तैनात केली आहेत. ट्रक चालकाचा वेग जास्त असल्याने वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या दुर्घटनेबद्दल झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून, मृतांच्या कुटुंबीयांप्रति शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. जखमी मुलीच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.

About Belgaum Varta

Check Also

ऊस उत्पादकांसाठी केंद्र सरकारचे महत्त्वाचे पाऊल; समस्यांच्या अभ्यासासाठी संयुक्त समिती स्थापन

Spread the love  प्रल्हाद जोशी यांच्या पुढाकाराने निर्णय; कर्नाटक-महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांशी थेट संवाद साधणार समिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *