


ग्वाल्हेर : नवरात्रीच्या निमित्ताने शीतलामाता देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे धान्याने भरलेला ट्रक बॅरिकेड तोडून भाविकांच्या अंगावर धावल्याने झालेल्या भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला, तर २९ जण जखमी झाले. जखमींमध्ये कर्तव्यावर असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. रविवारी मध्यरात्री सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
बॅरिकेड तोडून ट्रक भाविकांच्या अंगावर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छिनोरच्या दिशेने शीतलामाता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर उतार आहे. या मार्गावर जड वाहनांना प्रवेशबंदी असतानाही धान्याने भरलेला ट्रक तेथे आला होता. रस्त्यावर लावलेले बॅरिकेड तोडून ट्रक पुढे गेला. त्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक उतारावरून वेगाने खाली आला.
या वेळी ट्रक मंदिराच्या बाहेरील भिंतीला आणि प्रवेशद्वाराला धडकला. रस्त्यावरून जाणारे अनेक भाविक ट्रकखाली सापडले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.
३९ जण रुग्णालयात दाखल
अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने घटनास्थळी मदतकार्य सुरू केले. जखमींना रुग्णवाहिकांमधून रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केलेल्या ३९ जणांपैकी १२ जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. उर्वरित जखमींवर उपचार सुरू असून, पाच ते सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.
जखमींच्या दुखापतींचे स्वरूप स्पष्ट होण्यासाठी सीटी स्कॅन आणि एक्स-रे तपासण्या करण्यात येत आहेत. जखमींमध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश असून, त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत.
ट्रकच्या तांत्रिक स्थितीची तपासणी
या अपघातानंतर ट्रक बॅरिकेड तोडून प्रतिबंधित मार्गावर कसा आला, याचा तपास प्रशासनाकडून सुरू आहे. ट्रकमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता का किंवा चालकाचे नियंत्रण नेमके कशामुळे सुटले, याची माहिती घेण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पथकाला घटनास्थळी पाठविण्यात आले आहे.
नवरात्रीच्या काळात मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असताना घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. अपघाताच्या कारणांचा तपास सुरू असून, प्रशासनाकडून पुढील कार्यवाही केली जात आहे.

Belgaum Varta Belgaum Varta