


बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे नेते शुभम शेळके आणि मनोहर हुंदरे यांना खडेबाजार पोलिसांनी गुरुवारी (दि. २२ ऑक्टोबर) अटक करून न्यायालयासमोर हजर केले. बेळगाव येथील तिसरे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने दोघांनाही ४ नोव्हेंबर २०२६ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
वर्षभरापूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयाबाहेर घडलेल्या घटनेप्रकरणी खडेबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (अॅट्रॉसिटी) गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती आहे.
या प्रकरणातील शुभम विक्रांत शेळके (रा. तानाजी गल्ली, बेळगाव) आणि मनोहर अप्पाजी हुंदरे (रा. चेलवेनट्टी, बेळगाव) यांच्याविरुद्ध न्यायालयाने उद्घोषणा (Proclamation) जारी केली होती. न्यायालयाने निर्धारित केलेल्या मुदतीत हजर न राहिल्याने त्यांना फरार आरोपी घोषित करण्याबाबत न्यायालयाने आदेश दिले होते.
गुरुवारी सकाळी पोलिसांनी शुभम शेळके यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले. त्यानंतर दुपारी सुमारे दीडच्या सुमारास शुभम शेळके आणि मनोहर हुंदरे पोलीस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दोघांची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली.
त्यानंतर रात्री सुमारे आठ वाजता दोघांना माननीय न्यायमूर्ती एच. एस. मंजुनाथ यांच्यासमोर हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने दोघांनाही ४ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
या कारवाईमुळे बेळगावातील महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली असून, या प्रकरणाची राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta