



मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम; मोर्चा काढण्याचा इशारा
बेळगाव : कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरातील मराठी आणि इंग्रजी भाषेतील फलक झाकण्यात अथवा हटविण्यात आल्याच्या प्रकाराविरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठी फलक हटविणाऱ्या संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच मराठी फलकांना लक्ष्य करणाऱ्या कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांना आवर घालावा, अशी मागणी समितीने केली आहे. आठ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास पुढील पंधरा दिवसांत मोर्चा काढून रस्त्यावर उतरण्याचा इशाराही समितीने दिला आहे.

शुक्रवारी (६ नोव्हेंबर) मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले. त्यानंतर पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांची भेट घेऊन मराठी फलकांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. यावेळी समितीचे नेते तथा माजी आमदार मनोहर किनेकर, अध्यक्ष प्रकाश मरगाळे, माजी महापौर मालोजी अष्टेकर, ऍड. एम जी पाटील, आर. एम. चौगुले, रणजीत चव्हाण-पाटील, ऍड. अमर येळ्ळूरकर, नेताजी जाधव, विकास कलघटगी, दत्ता उघाडे, महेश जुवेकर, दुधाप्पा बागेवाडी, अंकुश केसरकर, श्रीकांत कदम, उमेश पाटील, सचिन केळवेकर, किरण हुद्दार आदी उपस्थित होते.
राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर १ नोव्हेंबरपूर्वी शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मराठी आणि इंग्रजी भाषेतील फलक कोणतीही पूर्वसूचना अथवा कायदेशीर नोटीस न देता झाकण्यात किंवा हटविण्यात आल्याचा आरोप समितीने केला आहे. खासगी मालमत्तेवर व्यावसायिक अथवा सामाजिक संस्थांनी लावलेल्या फलकांवर अशा प्रकारे कारवाई करण्याचा पोलिसांना अधिकार नसल्याचे समितीने निवेदनात नमूद केले आहे.
यापूर्वी २२ जून रोजीही याच प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याबद्दल समितीने नाराजी व्यक्त केली.
समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्या खासगी कार्यालयावरील फलक हटविण्यासाठी खडेबाजार पोलिसांकडून फोन आल्याचा आरोपही करण्यात आला. खासगी जागेतील कार्यालयावर लावलेला मराठी फलक हटविण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला, असा संतप्त सवाल समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, काही कन्नड संघटनांचे कार्यकर्ते व्यावसायिकांवर मराठीऐवजी कन्नड भाषेत फलक लावण्यासाठी दबाव आणत असल्याचा आरोपही समितीने केला. अशा प्रकारांना प्रशासनाने वेळीच आळा घालावा आणि शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवावी, अशी मागणी करण्यात आली.
आठ दिवसांत कारवाई न झाल्यास मोर्चा
जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी. कोणत्याही संघटनेच्या दबावाखाली न येता प्रशासनाने निष्पक्ष भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा समितीने व्यक्त केली आहे. आठ दिवसांत मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्यास पुढील पंधरा दिवसांत भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
या इशाऱ्यामुळे बेळगावातील मराठी फलकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे मराठी भाषिकांचे लक्ष लागले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta