



जयवंत हम्माण्णावर यांनी पॅरा-चॅम्पियन्ससह घेतली पंतप्रधानांची भेट
नवी दिल्ली / बेळगाव : बेळगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया (PCI) चे सरचिटणीस आणि बेळगावच्या बसवन कुडची येथील रहिवासी जयवंत गुंडू हम्माण्णावर यांनी ५ नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारताच्या आशियाई पॅरा गेम्समधील ऐतिहासिक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या गौरव सोहळ्यात त्यांना सहभागी होण्याची संधी मिळाली.
आयची-नागोया २०२६ आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंनी अभूतपूर्व कामगिरी करत तब्बल ११४ पदकांची कमाई केली. यामध्ये ३० सुवर्ण, ३५ रौप्य आणि ४९ कांस्य पदकांचा समावेश आहे. भारतीय पॅरा क्रीडा क्षेत्रासाठी ही आजवरची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
या ऐतिहासिक यशाबद्दल भारतीय पॅरा खेळाडूंचा गौरव करण्यासाठी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदकविजेत्या खेळाडू, प्रशिक्षक आणि पॅरालिम्पिक कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. खेळाडूंशी संवाद साधत त्यांच्या जिद्दीचे आणि संघर्षाचे कौतुक केले. तसेच पॅरा क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि प्रोत्साहनाबद्दलही चर्चा केली.
जयवंत हम्माण्णावर यांच्या प्रशासकीय नेतृत्वाखाली भारतीय पॅरा क्रीडा क्षेत्राने मिळवलेले हे यश विशेष उल्लेखनीय मानले जात आहे. बेळगावच्या मातीतून राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळणाऱ्या हम्माण्णावर यांना देशाच्या पंतप्रधानांसोबत व्यासपीठावर उपस्थित राहण्याची मिळालेली संधी ही बेळगावकरांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
या भेटीनंतर आनंद व्यक्त करताना जयवंत हम्माण्णावर म्हणाले, “देशाचे आणि माझ्या बेळगावच्या मातीचे राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणे हा माझ्यासाठी सर्वोच्च बहुमान आहे. आशियाई पॅरा चॅम्पियन्ससह आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणे हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे. पंतप्रधानांचे प्रोत्साहन आणि सर्वसमावेशक क्रीडा क्षेत्राबद्दलची त्यांची दूरदृष्टी खेळाडूंना प्रेरणा देणारी आहे. ११४ पदकांचा ऐतिहासिक टप्पा ही केवळ सुरुवात असून, आता आमचे पुढील लक्ष्य लॉस एंजेलिस २०२८ पॅरालिम्पिक स्पर्धा आहे.”
बेळगावच्या सुपुत्राने राष्ट्रीय पातळीवर मिळवलेल्या या सन्मानामुळे क्रीडा क्षेत्रातून तसेच बेळगावकरांमधून त्यांचे अभिनंदन होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta