Friday , November 6 2026
Breaking News

कै. श्रीमती पद्मजादेवी हलगेकर स्पर्धा परीक्षा केंद्राचे खानापूरातील म मं ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयात शानदार उद्घाटन

Spread the love

 

खानापूर : मराठा मंडळ संचालित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर तालुक्यातील व बेळगाव जिल्ह्यातील कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे सुपरिचित महाविद्यालय असून येथील विद्यार्थ्यांनी अलिकडे स्पर्धा परीक्षांचाही मागोवा घेताना दिसत आहेत. मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यांच्या दूरदृष्टी मार्गदर्शनाखाली येथील विद्यार्थिंनींना यु पी एस सी, एम पी एस सी, के पी एस सी, के ए एस याच बॅंकिंग आणि अग्नीवीर एअर फोर्स सारख्या स्पर्धा परींक्षांची पाया भरणी करता यावी यासाठी या कै. श्रीमती पद्माजादेवी हलगेकर स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात खानापूर तालुक्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या शेकडो पालकांच्या उपस्थितीत पुण्याचे नामवंत वास्तुविशारद श्री पिटर डिसोझा व गर्लगुंजी गावचे उच्चविद्याविभूषित जनसेवक श्री. प्रसाद विठ्ठल पाटील व संचालक श्री. शिवाजी पाटील यांच्या शुभहस्ते करून हे दालन होतकरू व अभ्यासू विद्यार्थिंनींना अर्पण करण्यात आले.
मोबाईलचा मोह व अनाठायी वापर टाळून विद्यार्थीनींनी महाविद्यालयीन शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षांचा मागोवा घ्यावा यासाठी या महाविद्यालयात आधुनिक परींक्षसाठी लागणारी सर्व पुस्तके या कै श्रीमती पद्मजादेवी हलगेकर स्पर्धा परीक्षेच्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध करण्यात आली असून या ग्रथालयात पुणे, बेंगळूर आणि मुंबई येथे उपलब्ध असणाऱ्या ज्ञानकोषांची उपलब्दता पुण्याचे व्यावसायिक श्री. शिवानंद चन्नेवाडकर, श्री. पिटर डिसोझा यांच्या भरीव योगदानातून करण्यात आली असून गर्लगुंजीचे जन सेवक अभ्यासू प्रसाद पाटील यांनीही या स्पर्धा केंद्रासाठी रू 25000 ची पुस्तक व इतर स्पर्धा साहित्य देण्याची घोषणा केली आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद पाटील, संस्थेचे संचालक शिवाजीराव पाटील, प्रा. टी आर जाधव, पालक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या प्रार्थनागीताने झाली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व कै. श्रीमती पद्मजादेवी हलगेकर यांच्या प्रतिमांचे पूजन तसेच दीपप्रज्ज्वलन मान्यवर, पालक व विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रा. पी. व्ही. कर्लेकर यांनी प्रास्ताविकातून या उपक्रमामागील संकल्पना व उद्देश स्पष्ट केला. यावेळी प्रमुख पाहुणे पीटर डिसोझा, प्रसाद पाटील व शिवाजीराव पाटील यांचा प्राध्यापक व पालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या उपक्रमाला पुस्तक देणगीच्या माध्यमातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये Word Power Made Easy, माझी पदवी माझे करिअर, कोडींग , General English, GK 2027, General Knowledge,एन सी आर टी पुस्तक संच,तात्याचा ठोकळा, प्रतियोगिता दर्पन, व्हिझार्ड सारख्या साप्ताहिक व मासिकांचाही व एकापेक्षा एक दर्जेदार शेकडो ज्ञानकोषांचा समावेश आहे. या दालनांची जबाबदारी वाणिज्य विभागाचे अभ्यासू प्राध्यापक श्री पी. व्ही कर्लेकर व श्रीमती एम वाय देसाई यांनी घेतली असून येणाऱ्या काळात अशा स्पर्धा परीक्षांची जोरदार तयारी करून घेण्याचा निश्चय त्यांनी केला आहे.
या कार्यक्रमात श्रीयुत पीटर डिसोझा यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांच्या जीवनात पालक आणि शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित केले. ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे’ या विचाराचा अर्थ स्पष्ट करताना ज्ञान, मदत आणि चांगले विचार यांची देवाणघेवाण समाजाला समृद्ध बनवते, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी श्रद्धा, जीवनाचे ध्येय, कष्ट, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण प्रयत्न ही यशाची पाच सूत्रे आत्मसात करावीत, असे ही आवाहन त्यांनी केले. प्रसाद पाटील यांनी यूपीएससी परीक्षेविषयी सखोल व अंत्यत अभ्यासपूर्ण स्पर्धा परींक्षा व तयारीचा माहितीपट मांडला. स्पर्धा परीक्षांचे स्वरूप, तयारीची पद्धत, अभ्यासातील सातत्य आणि प्रशासकीय सेवेसाठी आवश्यक असणारी जिद्द याविषयी त्यांनी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या सामर्थ्यांची, कमतरतांची, उपलब्ध संधींची आणि संभाव्य आव्हानांची जाणीव ठेवून योग्य नियोजन करावे, असे सांगितले. पुस्तकांचे नियमित वाचन, वृत्तपत्रांचा अभ्यास आणि चालू घडामोडींचे ज्ञान यांना विशेष महत्त्व द्यावे, असेही त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य अरविंद पाटील यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक पुस्तके, अभ्यासाचे वातावरण आणि मार्गदर्शन महाविद्यालयातच उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी या सुविधेचा पुरेपूर लाभ घेऊन आपल्या ध्येयपूर्तीसाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन केले. “कै. श्रीमती पद्मजादेवी हलगेकर यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आलेला हे स्पर्धा परीक्षा दालन विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना प्रतिभेचे पंख प्राप्त करून देणारे आणि त्यांच्या प्रशासकीय सेवेकडे जाणाऱ्या वाटचालीला बळ देणारे ठरणार असून खानापूर तालुक्यातील हे पहिले पदवीपूर्व महाविद्यालय आहे जिथे योग्य वयात अभ्यासू विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक दृष्टीकोण दिला जाणार आहे, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. वनिता गवाडे यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर तालुक्यातील रेशन वितरण व्यवस्था जिल्ह्यात अव्वल

Spread the love  रेशन दुकानदारांच्या मासिक बैठकीत सुर्यकांत कुलकर्णी यांचे गौरवोद्गार; ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *